हनी ट्रॅप म्हणजे काय असतं? ‘LCB’प्रमुख बळीराम गीते सांगतात…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेकदा वर्तमानपत्रात हनी ट्रॅप हा शब्द अनेकांच्या वाचनात येतो. काल 18 मार्चला ‘हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी महिला बेपत्ता’ या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर बुलडाणा लाइव्हच्या अनेक जागरूक वाचकांकडून हनी ट्रॅप म्हणजे नेमके काय असते, असा प्रश्न विचारण्यात आला. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अनेकदा वर्तमानपत्रात हनी ट्रॅप हा शब्द अनेकांच्या वाचनात येतो. काल 18 मार्चला ‘हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी महिला बेपत्ता’ या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर बुलडाणा लाइव्हच्या अनेक जागरूक  वाचकांकडून हनी ट्रॅप म्हणजे नेमके काय असते, असा प्रश्न विचारण्यात आला. बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखा (एलसीबी) प्रमुख बळीराम गीते यांनी हनी ट्रॅप म्हणजे नेमके काय असते याची माहिती बुलडाणा लाइव्हला दिली.

मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक, सुंदर व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात, असं श्री. गीते यांनी सांगितलं. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. आता पत्रकारितेत हा शब्द सर्वाधिक वापरला जातो. या प्रकारावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही होऊन गेले आहेत.

इतिहासातही अनेक दाखले

‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणं बघायला मिळतात. राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर होत आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदललं आहे. पूर्वी ‘हनी ट्रॅप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्स अॅप, इंस्टाग्राम, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतूनही सावज हेरले जातात. अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते. उदा. न्यूड फोटो पाठवून ते आपले असल्याची खात्री समोरच्याला पटवली जाते. त्याची खात्री पटली की त्यालाही तसे फोटो पाठवण्यास सांगितलं जातं. एखाद्यानं हे फोटो पाठवले की मग तो अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो. तिथून मग पैशांची मागणी अथवा मानसिक छळाला सुरुवात होते. हल्ली एखादा क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून एखाद्यानं त्यास प्रतिसाद दिला की मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते. मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा वापर करून खंडणी मागितली जाते. अंचरवाडी येथील एका विवाहित महिलेने अशाच हनी ट्रॅपमध्ये देऊळगाव मही येथील सधन शेतकऱ्याला फसविण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याच्‍या शेतात ही महिला मजुरी करायची. त्यातून दोघांची ओळख अन्‌ फोनवर बोलणेही वाढले. फोनवरील बोलणे आणि व्हिडीओ  महिलेने रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्यानंतर हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल न करण्यासाठी महिला त्या शेतकऱ्याला वारंवार पैशांची मागणी करत होती.

असे व्हा सावध…

आताच्या जमान्यात कोण कसा ‘ट्रॅप’ लावेल सांगता येत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडं चॅट किंवा संवाद साधण्याचा  मोहात पडू नका, असा सल्ला श्री. गीते यांनी दिला.अनोळखी लोकांना वैयक्तिक माहिती पाठवू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक केले पाहिजे. तरीही फसवणूक झालीच तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. गीते यांनी केले.

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते…

अनेकदा अशा ट्रॅपमध्ये अडकलेले लोक बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार देत नाहीत. त्यामुळे अशा हनी ट्रॅपमध्ये ते अधिक अडकत जातात. मात्र पोलिसांना अशा प्रकरणाची माहिती दिल्यास संबंधित तक्रारदाराचे किंवा हनी ट्रॅप पीडित व्यक्तीचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवण्यात येते, असे श्री. गीते यांनी सांगितले.