हातचलाखी… एटीएम कार्डची अदलाबदल करून १ लाखाने गंडविले; नांदुऱ्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ड्रायव्हरच्या बँक खात्यातून १ लाख ६ हजार रुपये उडविल्याची घटना १७ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास नांदुरा शहरात घडली. ड्रायव्हर सुनील मारोती देशमुख (३०) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील देशमुख हे स्टेट बँक इंडियाच्या नांदुरा शाखेतील एटीएममध्ये …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ड्रायव्हरच्‍या बँक खात्यातून १ लाख ६ हजार रुपये उडविल्याची घटना १७ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास नांदुरा शहरात घडली. ड्रायव्हर सुनील मारोती देशमुख (३०) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुनील देशमुख हे स्टेट बँक इंडियाच्‍या नांदुरा शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाहीत. त्यांच्या मागे पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या अनोळखी माणसाने त्यांना म्हटले की दोबारा पिन डालो. त्यानंतर देशमुख यांनी दुसऱ्यांदा पिन टाकला. मात्र पैसे निघाले नाहीत. तेव्हा तो अनोळखी व्यक्ती देशमुख यांना म्हणाला, की बाजू में हो जाओ तुम्हारा कार्ड ब्लॉक हो गया, असे म्हणत त्याने देशमुख यांच्या हातात एटीएम कार्ड दिले. पैसे निघाले नाही म्‍हणून देशमुख घरी जाऊन झोपून राहिले. संध्याकाळी पावणेपाचला त्यांच्या मोबाइलवर १० हजार रुपये काढल्याचा मॅसेज आला. त्‍यामुळे देशमुख यांनी त्यांचे एटीएम कार्ड तपासले असता त्यांच्‍याकडे दुसऱ्याच नारायण बटवाल नावाच्या व्यक्तीचे एटीएम कार्ड दिसले.

तेव्हा त्यांना त्यांचे एटीएम बदलले गेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांना लगेच एकापाठोपाठ एक त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे मॅसेज आले. देशमुख यांनी लगेच बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या खात्यातील उरलेले एक लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले व बँक खाते ब्लॉक करण्यात आले. देशमुख जेव्हा दुपारी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते तेव्हाच त्यांच्यामागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीनेच खात्यातून १ लाख ६ हजार रुपये उडविले असल्याचे देशमुख यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्‍तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.