हातपाय बांधलेला, पोटाला दगड बांधून नदीत फेकलेला मृतदेह रुम्‍हणाच्या शेतकऱ्याचा!; अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या कॉलनंतर झाले होते गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनसावंगीच्या (ता. चिखली) पैनगंगा नदीच्या पुलापर्यंत वाहत आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो रुम्हणा (ता. सिंदखेड राजा) येथून बेपत्ता झालेल्या 53 वर्षीय शेतकऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. हातपाय बांधून, पोटाला दगड बांधून त्यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला होता. त्यामुळे खून झाल्याचे दिसत असून, त्यादृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेनसावंगीच्‍या (ता. चिखली) पैनगंगा नदीच्‍या पुलापर्यंत वाहत आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो रुम्‍हणा (ता. सिंदखेड राजा) येथून बेपत्ता झालेल्या 53 वर्षीय शेतकऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. हातपाय बांधून, पोटाला दगड बांधून त्‍यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला होता. त्‍यामुळे खून झाल्याचे दिसत असून, त्‍यादृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रंगनाथ तुकाराम खेडकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्‍यांना तुमची पीक विम्याची कागदपत्रे कमी आहेत, असे कुणीतरी मोबाइलवर सांगून 31 मे रोजी पांग्री उगले फाट्याकडे गेले होते. त्‍यानंतर ते परतले नाहीत. त्‍यांना कॉल करून बोलणाऱ्याने आपण सिंदखेड राजा येथील कृषी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले होते. घरून निघाल्यानंतर काही वेळाने त्‍यांचा मोबाइल बंद आला होता. ते हरवल्याची तक्रारही कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना एका व्‍यक्‍तीचा मोबाइल हिसकावून त्‍यावरून खुन्याने रंगनाथ खेडकर यांना कॉल केल्याचे समोर आले होते. त्‍यामुळे संशय वाढला होता. त्‍यातच पेनसावंगीत शिवारात त्‍यांचाच मृतदेह आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. बुलडाणा लाइव्‍हवर मृतदेहाची बातमी झळकताच रुम्‍हणा येथील प्राचार्य शिवराज कायंदे, ज्ञानदेव खेडकर, देवानंद कायंदे आदींनी काही लोकांसह तिथे जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. पेनसावंगीच्‍या पोलीस पाटील सौ. गिता प्रविण शेजोळ (30) यांना 3 जूनला दुपारी साडेचारच्‍या सुमारास पती प्रविण शेजोळ यांच्याकडून मृतदेहाची माहिती कळाली होती.