हुश्शऽऽ.. शिवसेनेनेही टाकला गायकवाड-कुटे वादावर पडदा; खासदार प्रतापराव जाधव यांनी केली घोषणा; IG म्‍हणाले, कालच्‍या प्रकरणातील दोषींची गय नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कालपासून आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय कुटे यांच्यात पेटलेले युद्ध अखेर शमले आहे. सकाळी आमदार कुटे यांनी हा विषय आमच्यासाठी संपल्याचे जाहीर केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिवसेनेकडून हा विषय संपल्याचे जाहीर केले. आज सकाळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेते बुलडाण्यात दाखल झाले. त्यात खासदार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कालपासून आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय कुटे यांच्‍यात पेटलेले युद्ध अखेर शमले आहे. सकाळी आमदार कुटे यांनी हा विषय आमच्‍यासाठी संपल्याचे जाहीर केल्यानंतर दुपारी दीडच्‍या सुमारास खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिवसेनेकडून हा विषय संपल्याचे जाहीर केले.

आज सकाळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेते बुलडाण्यात दाखल झाले. त्‍यात खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जालिंधर बुधवत, श्याम उमाळकर, नरेंद्र खेडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील, संतोष रायपुरे, रोहित खेडेकर, नंदू कऱ्हाडे, पांडुरंग सरकटे,अरविंद कोलते यांसह 200 ते 300 कार्यकर्त्यांचा समावेश होता. मागण्यांचे निवेदन त्‍यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना दिले. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार जाधव म्‍हणाले, की दुर्दैवाने अशा घटना घडू नये. भावनेच्‍या आहारी जाऊ नये. सर्वांनी शब्‍द मोजून मापून वापरले पाहिजेत. आपल्या कुणा जवळच्‍या व्‍यक्‍तीला, कार्यकर्त्याला बेड उपलब्‍ध होत नाही, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्‍ध होत नाही, इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाही. त्‍यामुळे त्रागा होतो. त्‍यातून अपशब्‍दही निघतो. मात्र त्‍याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. त्‍यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत. सध्या काही लढाई करण्याचे दिवस नाहीत. भांडण्याचे दिवस नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यात शांतता राहिली पाहिजेत. आमच्‍यासाठी हा विषय आता संपलेला आहे. ज्‍याला कुणाला शक्‍ती प्रदर्शन करायचे असेल त्‍यांनी आपली शक्‍ती कोरोनाविरोधात लढण्यासाठी वापरावी. आपापल्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, नातेवाइकांचे जीव वाचविण्यात शक्‍ती खर्च करावी. शक्‍ती प्रदर्शन करण्याची गरज आताच्‍या काळात तरी नाही, असेही खासदार श्री. जाधव म्‍हणाले. दरम्‍यान, जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्‍यानंतर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. तिथे त्‍यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातीलच मागण्या केल्या. तसेच वाढत्‍या कोरोनामुळे परिस्‍थिती बिघडत असल्याचे निदर्शनास आणून देत पोलीस प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. मीना बुलडाण्यातून रवाना झाले असून, त्‍यांनी परत जाताना पत्रकारांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की कालच्‍या प्रकरणात जे जे नावे समोर येतील त्‍यांच्‍याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.

फडणवीस, दरेकर, पाटलांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करा ः शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बुलडाणा जिल्ह्यात व महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या नागरिकांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरवून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व चंद्रकांत पाटील आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करावा व आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्याच्‍या तरतुदीनुसार कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्‍या लोकप्रतिनिधी, नेत्‍यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्‍हटले आहे, की ऑक्‍सिजन, लसीकरण, रेमडेसिविर इंजेक्‍शन, व्‍हेंटिलेटर, बेड उपलब्‍धततेकरिता राज्‍य सरकार केंद्राकडे वारंवार मागणी करत आहे. मात्र फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील त्‍यात खोडा घालत आहेत. केंद्राकडून मदत मिळू नये म्‍हणून ते प्रयत्‍नशील आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन ते राज्‍य सरकारची बदनामी करत आहेत. दुसरीकडे याच सुविधा भारताकडून पाकिस्‍तान, बांगलादेश, नेपाळला मोफत पाठवल्या जात आहेत. ही कृती राज्‍याच्‍या विरोधी तसेच नागरिकांच्‍या मुलभूत अधिकारांचे हनन करणारी आहे. औषधाचा काळाबाजार करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीची माहिती मिळाल्याने या कंपनीची चौकशी होत असताना फडणवीस, दरेकर हे पोलिसांवर दबाव आणून कंपनीला वाचविण्याचा प्रयत्‍न करत आहेत. ही बाब चुकीची व शासकीय कामात अडथळा आणणारी आहे. त्‍यामुळे तोही त्‍यांच्‍याविरुद्ध स्‍वतंत्र गुन्‍हा दाखल होणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार राजेश एकडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रा. नरेंद्र खेडेकर, भास्‍करराव मोरे, ॲड. नाझेर काझी, जालिंधर बुधवत, शांताराम दाने, सौ. आशाताई झोरे, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्‍या सह्या आहेत.