हे राम… देऊळघाटमध्ये सरपंच पदाची निवडणूक तिसऱ्यांदा पुढे ढककली!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोप- प्रत्यारोपामुळे जिल्हाभर चर्चेत आलेली आणि राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनलेली देऊळघाटच्या (ता. बुलडाणा) सरपंच पदाची निवडणूक आज, 3 मार्चला पुन्हा पुढे ढकलण्यात आली. 17 पैकी केवळ 8 सदस्यच सभेला ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाल्याने गणसंख्येअभावी सभा तहकूब करत नियमाप्रमाणे उद्या दुपारी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष देऊळघाट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आरोप- प्रत्‍यारोपामुळे जिल्हाभर चर्चेत आलेली आणि राजकीय नेत्‍यांसाठी प्रतिष्ठेची बनलेली देऊळघाटच्‍या (ता. बुलडाणा) सरपंच पदाची निवडणूक आज, 3 मार्चला पुन्हा पुढे ढकलण्यात आली. 17 पैकी केवळ 8 सदस्यच सभेला ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाल्याने गणसंख्येअभावी सभा तहकूब करत नियमाप्रमाणे उद्या दुपारी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष देऊळघाट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागून होते. 1 सदस्य अविरोध निवडून आल्याने 15 जानेवारीला 17 पैकी 16 सदस्यांसाठी निवडणूक पार पडली होती. 18 जानेवारीला निकाल घोषित करण्यात आले. काँग्रेस पृस्कृत ग्रामविकास पॅनलचे 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सामाजिक एकता पॅनलचे 8 सदस्य निवडून आले. सरपंचपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले. सरपंच पदाची निवडणूक 9 फेब्रुवारीला घेण्यात आली मात्र अनुसूचित जातीच्या एकाही महिला सदस्याने अर्ज दाखल न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महिला आरक्षण ऐवजी सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित केले. त्यानंतर 26 फेब्रुवारीला सरपंच पदाची निवडणूक होणार होती. मात्र वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक स्थगित करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निवडणूक आज 3 मार्च रोजी घेण्याचे ठरले होते. ग्रामविकास पॅनलकडून परवीन बी जावेद खान तर सामाजिक एकता पॅनलकडून रूपचंद रामचंद पसरटे यांनी सरपंच पदासाठी अर्जही दाखल केले.मात्र दुपारी 2:30 वाजता निवडणूक होणे अपेक्षित असताना नियोजित वेळी केवळ 8 सदस्यच ग्रामपंचायत भवन मध्ये उपस्थित होते. 9 सदस्य गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळे आजची ही सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा नियमाप्रमाणे उद्या 4 मार्च रोजी घेण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी दिली.