१२-१३ ट्रॅक्‍टरमध्ये ३०० वर ग्रामस्‍थ धडकले महावितरण कार्यालयात!; “कारण’…, सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेची समस्या सुटत नसल्याने हिवरखेड पूर्णा (ता. सिंदखेड राजा) येथील संतप्त ग्रामस्थांनी ३ ऑगस्टला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले होते. या ठिकाणी अधिकारी आणि ग्रामस्थांत शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे सहायक अभियंता नागेश गायकवाड यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून सरपंचासह १५ ते १६ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेची समस्या सुटत नसल्याने हिवरखेड पूर्णा (ता. सिंदखेड राजा) येथील संतप्‍त ग्रामस्‍थांनी ३ ऑगस्‍टला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले होते. या ठिकाणी अधिकारी आणि ग्रामस्‍थांत शाब्‍दिक चकमक झाली होती. त्‍यामुळे सहायक अभियंता नागेश गायकवाड यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात ग्रामस्‍थांविरुद्ध तक्रार दिली होती. त्‍यावरून सरपंचासह १५ ते १६ ग्रामस्‍थांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला होता. हे गुन्‍हे मागे घेण्यासाठी काल, ४ ऑगस्‍टला ३०० ते ४०० ग्रामस्‍थांनी महावितरण कंपनीला निवेदन दिले.

दोन महिन्यांपासून रोहित्र जळाल्‍याने गाव अंधारात आहे. त्‍यामुळे ग्रामस्‍थ वैतागले आहेत. मध्यंतरी बदलेले विद्युत रोहित्रही अर्धदुरुस्‍त असल्याने मूळ समस्या कायम आहे. त्‍यामुळे ग्रामस्‍थ महावितरणच्‍या उपविभागीय कार्यालयात समस्या सोडण्याची मागणी घेऊन आले होते. मात्र या ठिकाणी अधिकारी हजर नव्‍हते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर किनगाव राजाचे सहायक अभियंता नागेश गायकवाड दीड तास उशिराने कार्यालयात आले. त्‍यामुळे सरपंच व ग्रामस्‍थांनी त्‍यांचे फुलांचा हार घालून स्वागत केले.

त्‍यानंतर वीज समस्या मांडताना गायकवाड यांना धारेवर धरले. एवढ्यावरच न थांबता कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. त्‍यामुळे गायकवाड आणि ग्रामस्‍थांत वाद झाला. गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सरपंच सुनील गोरे यांच्‍यासह १५ ते १६ ग्रामस्‍थांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला. ही बाब गावात कळताच काल १२ ते १३ ट्रॅक्‍टरमध्ये ३०० ते ४०० ग्रामस्‍थ गुन्‍हे मागे घेण्याच्‍या मागणीसाठी महावितरण कार्यालयात दाखल झाले. भाजपचे ज्‍येष्ठ नेते तथा माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते विनोद वाघ यांच्‍या नेतृत्त्वात महावितरणला गुन्‍हे मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.