१३ मजुरांचे बळी जाण्याला “हा’ निर्णयही जबाबदार!; एक ना एक दिवस मोठ्या दुर्घटनेची आशंका होतीच!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खराब रस्त्यामुळे टिप्पर उलटून समृद्धी महामार्गाच्या कामावरील १३ परप्रांतीय मजूर काल, २० ऑगस्टला तढेगावजवळ (ता. सिंदखेड राजा) ठार झाले. राहेरीचा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने एसटी बससह अवजड वाहने तढेगाव – देऊळगाव मही मार्गाने वळविण्यात आली आहेत. ज्या रस्त्याने एका वाहनाला जातानाही तारेवरची कसरत करावी लागते, त्यावरून अवजड दुहेरी वाहतूक …
 
१३ मजुरांचे बळी जाण्याला “हा’ निर्णयही जबाबदार!; एक ना एक दिवस मोठ्या दुर्घटनेची आशंका होतीच!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खराब रस्‍त्‍यामुळे टिप्पर उलटून समृद्धी महामार्गाच्‍या कामावरील १३ परप्रांतीय मजूर काल, २० ऑगस्‍टला तढेगावजवळ (ता. सिंदखेड राजा) ठार झाले. राहेरीचा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने एसटी बससह अवजड वाहने तढेगाव – देऊळगाव मही मार्गाने वळविण्यात आली आहेत. ज्या रस्त्याने एका वाहनाला जातानाही तारेवरची कसरत करावी लागते, त्यावरून अवजड दुहेरी वाहतूक सुरू असल्यानेच हा अपघात झाला आणि त्यात १३ जणांनी प्राण गमावले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. त्यामुळे १३ बळी जाण्याचे भागीदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मेहकर – सिंदखेड राजा रस्त्याने जाणारी अवजड वाहने तढेगाव- देऊळगाव मही मार्गाने वळविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी अवजड वाहतूक पेलण्याची क्षमता या रस्त्याची आहे का, असा साधा विचारही प्रशासनाने केला नसेल का? तसा निर्णय घेण्यापूर्वी निकृष्ट आणि एकेरी असलेल्या या रस्त्याची डागडुजी का करण्यात आली नाही? असाही प्रश्न केला जात आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या अवजड वाहनांच्या यादीत मोडत नसल्याने ते त्या रस्त्याने फिरकतही नसतील. मात्र लांब पल्‍ल्याच्या एसटी बस, ट्रक, टिप्पर यांना मात्र याच पर्यायी वाहनाचा उपयोग करावा लागतोय. रस्ता पूर्वीपासून निकृष्ट आणि त्यातही अवजड वाहनांचा भार त्यामुळे तो आणखी निकृष्ट झालाय. रस्त्यात मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी, रस्त्याच्या खचत चाललेल्या कडा यामुळे आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भर पावसात या रस्त्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकदातरी प्रवास करून पहावाच, अशी संतप्‍त भावना काल अपघातस्‍थळी असलेल्यांनी बुलडाणा लाइव्हकडे व्‍यक्‍त केल्या.

बातमीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://youtu.be/LQurm8czB6c