12 जण क्रूझरमध्ये घेऊन जाणाऱ्याने पोलिसांना दिली धमकी, माझी गाडी अडवता काय, तुमची वर्दीच उतरवतो!; बुलडाणा शहरातील धक्‍कादायक प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारच्या लॉकडाऊनचे साइड इफेक्ट दिसू लागले आहेत.आज, 15 एप्रिलला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका क्रूझर चालकाने धाड नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घातला. तुमची वर्दी उतरवतो, अशी धमकीही त्याने पोलिसांना दिली. बराच वेळ त्याची ओरडा ओरड आणि गोंधळ सुरू होता. दुसरीकडे कडक निर्बंध केवळ नावालाच असून, लोकांची वर्दळ रस्त्यावर कायम …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारच्‍या लॉकडाऊनचे साइड इफेक्‍ट दिसू लागले आहेत.आज, 15 एप्रिलला सकाळी सव्वा अकराच्‍या सुमारास एका क्रूझर चालकाने धाड नाक्‍यावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घातला. तुमची वर्दी उतरवतो, अशी धमकीही त्‍याने पोलिसांना दिली. बराच वेळ त्‍याची ओरडा ओरड आणि गोंधळ सुरू होता. दुसरीकडे कडक निर्बंध केवळ नावालाच असून, लोकांची वर्दळ रस्‍त्‍यावर कायम असल्‍याने पुन्‍हा एकदा हा लॉकडाऊन केवळ व्‍यापाऱ्यांना संपविणारा फार्सच ठरला असल्याच्‍या संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धाड नाक्‍यावरील घटनेबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले, की पोलीस उपनिरिक्षक श्री. गवारगुरू, नापोकाँ श्री. पिंपळे, मपोकाँ. मयुरी काकडे यांच्‍यासह पो.ना. विठ्ठल काळुसे लॉकडाऊनच्‍या बंदोबस्‍तावर होते. सव्वा अकराला कोलवडकडून क्रूझर जीप (क्रमांक एमएच 20- सीएस 4983) आली. या जीपमध्ये 10 ते 12 लोक होते. पोलिसांनी गाडी अडवून विचारणा केली असता गाडीमालकाने नाव, गाव सांगण्यास नकार दिला. त्‍यामुळे पोलिस चालान मशीनमध्ये फोटो काढत असताना त्‍याने फोटो काढण्यासही विरोध सुरू केला. तुम्‍ही 2200 रुपये दंड कसा करता, असे म्‍हणून त्‍याने सोबतच्‍या लोकांना व्‍हिडिओ शूटिंग करायला सांगितले. माझी राजकीय लोकांसोबत ओळख असून, तुमचा व्‍हिडिओ व्‍हायरल करतो. तुमची नोकरी गमावतो, अशा धमक्‍या देऊ लागला. कधी लग्‍नाला तर कधी अंत्‍यसंस्‍काराला जात असल्याचे तो सांगत होता. त्‍याचवेळी सागवनचे ग्रामपंचायत कर्मचारी दिनकर जाधव, राहुल जगताप, नंदू बरडे हे पोलिसांच्‍या मदतीला धावून आले. वाहनावर कारवाई करण्यात आली. क्रूझरचा मालक अहेमद खाँ भिकन खाँ पठाण (रा. सिल्लोड) असल्याची माहिती मिळाली.

क्रूझरचालकाचा पोलिसांशी सुरू असलेला वाद.


पोलिसांशी वाद वाढले…
सततच्‍या लॉडाऊनला नागरिक वैतागले असून, यातून कर्तव्‍य निभावणाऱ्या पोलिसांशी त्‍यांचे वाद वाढत चालल्याने पोलिसही हैराण झाले आहेत. एकीकडे कर्तव्‍य तर दुसरीकडे नागरिकांची पोटतिडिक या दुहेरी कैचीत पोलीस सापडल्‍याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज
पोलिसही कर्तव्‍यावर असतात त्‍यांना आदेशाबरहुकूम काम करावे लागते. त्‍यात लॉकडाऊनचा बंदोबस्‍तही आहे. थेट मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्‍याने स्‍थानिक पातळीवर त्‍याची अंमलबजावणी केल्यावाचून अधिकाऱ्यांनाही पर्याय नाही. त्‍यामुळे पोलीस किंवा अन्य अधिकाऱ्यांशी वाद घालून शांतता भंग करण्याऐवजी नागरिकांनीच नियम पाळण्याची गरज सध्या तरी आहे.