12 बलुतेदारांसाठी स्‍वतंत्र पॅकेज घोषित करा; भाजपा ओबीसी मोर्चाच्‍या शालिनीताई बुंधे यांची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांनी आज, 26 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की 5 एप्रिल 2021 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः १२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे त्‍यांच्‍यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्‍या ओबीसी मोर्चाच्‍या प्रदेश सचिव सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांनी आज, 26 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्‍हटले आहे, की 5 एप्रिल 2021 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट आदी १२ बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आधीच गरीब परिस्थितीत असलेले हे समाज आर्थिक अडचणीत आले आहेत. एकप्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट आदी १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही. राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूती पूर्वक विचार करून त्‍यांना प्रति कुटूंब किमान ५००० रुपये आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत बेड उपलब्ध होत नाही म्‍हणून कोविड केअर सेंटर तालुका स्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल याबाबत प्रयत्‍न करावे, अशीही मागणी त्‍यांनी केली आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष राजेंद्र पवार, विलास शिरसाट आदी उपस्‍थित होते.