क्राईम डायरीमुख्य बातम्या

14 वर्षीय मुलीचे लावणार होते लग्‍न!; हळदही लागली… पोलिसांनी रात्रीच धाव घेऊन थांबवला बालविवाह!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात एकाच दिवशी लागणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. काल, 26 एप्रिल रोजी बुलडाण्यातील सागवन व जळगाव जामोद तालुक्यातील  मोहिदेपूर येथे बालविवाह होणार होते. मात्र वेळेपूर्वीच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या मदतीने हे विवाह रोखण्यात आले आहेत.

भोकरदन (जि. जालना) येथील 14 वर्षीय बालिकेचा विवाह सागवन (ता. बुलडाणा) येथे होणार होता. अवघ्या 14 व्या वर्षी तिच्या आई- वडिलांना वराकडील मंडळीनी पैशांचे आमिष देत दीड लाख उपकारी देऊन हा बाल विवाह करण्याचे ठरविले होते. बाल विवाह होत असल्याची माहिती चाइल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सर्व बाल संरक्षण यंत्रणांना सूचित करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महिला बाल सहाय्यता कक्षप्रमुख अलका निकाळजे, बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय  विनायक रामोड, एएसआय राजेश गणेशे, नापोकाँ  भगवान शेवाळे, पोकाँ दीपमाला उमरकर,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. दिवेश मराठे यांच्‍यासह संरक्षण अधिकारी सागर राऊत, प्रदीप सपकाळ व चाइल्ड लाईन समन्वयक शोएब शेख, बालस्‍नेही कार्यकर्ते अमित देशमाने आदींनी रात्री सागवान परिसरात बालिकेचा शोध घेतला. मुलीला लग्‍नाची हळद लागलेली असताना पोलिसांनी हा बाल विवाह रोखला. तिच्या सुरक्षेसाठी तिला सखी वन स्टॉप सेंटरला रात्रीच दाखल करण्यात आले. सकाळी बालिकेला बाल कल्याण समितीच्‍या समक्ष हजर करण्यात आले. समितीमार्फत घटनेची पूर्ण चौकशी करून सागवनचे ग्रामसेवक तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिकारी अरविंद टेकाळे यांना या बाल विवाह विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आगामी  होणाऱ्या बाल विवाहांबाबत टास्क फोर्स निर्मिती संदर्भात सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांना दिल्या आहेत.

एकाच मंडपात 3 भावंडांचे लग्‍न, पण एक वधू 17 वर्षीय…

जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथेही 17 वर्षीय बालिकेचा विवाह आई- वडील व नातेवाइकांना समज देऊन थांबविण्यात आला. एकाच मंडपात 3 भावंडांचे लग्न नियोजित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या तीन भावंडांपैकी एका बालिकेचे वय विवाह योग्य नसल्याने गाव स्तरावर बैठक घेत गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी व ग्राम बाल संरक्षण समितीच्या उपस्थितीत पालकांना बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत बाल विवाह थांबविण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व कारवाईची धुरा पोलीस प्रशासनाने सांभाळली होती. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) व  जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांच्यासह एएसआय लक्ष्मण गव्हाळे, पोकाँ सचिन राजपूत, शेख इरफान, आशा इंगळे, बबिता डोंगरे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी श्री. कुमरे यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत ही कारवाई केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: