2 च्या ठोक्याला सभा, 3 वाजता गुलालाची उधळण! काही तासांतच होणार 164 सरपंचांचा फैसला!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 164 गाव परिसरात आज, 9 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत (राजकीय) तणावपूर्ण शांतता राहणार असून, सध्यातरी ही गावे सायलेंट मोडवर आहेत. दुपारी 2 च्या ठोक्याला या सर्व गावांत विशेष सभांना प्रारंभ होणार असून, दुपारी 3 च्या आसपास अक्षरशः व्हायब्रेटींग मोड असणार्या या गावात ढोल ताशांच्या निनादात गुलालाची …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 164 गाव परिसरात आज, 9 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत (राजकीय) तणावपूर्ण शांतता राहणार असून, सध्यातरी ही गावे सायलेंट मोडवर आहेत. दुपारी 2 च्या ठोक्याला या सर्व गावांत विशेष सभांना प्रारंभ होणार असून, दुपारी 3 च्या आसपास अक्षरशः व्हायब्रेटींग मोड असणार्‍या या गावात ढोल ताशांच्या निनादात गुलालाची उधळण होणार आहे.
होय मागील एक-दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवाची आज पहिल्या टप्प्यातील दीडशेवर गावांत सांगता होणार असून, गावाचे सरपंच, उपसरपंच निवडले जाणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अस्सल, इरसाल ग्रामीण राजकारणाची व राजकारण्यांची आज फायनल मॅच आहे. बहुतेक गावात 2 उत्कृष्ट संघ (पॅनल) सरपंच चषकाच्या अंतिम सामन्यात झुंजणार आहेत. आजच्या दिवसासाठी गावपुढार्‍यांनी कसोटी सामन्यासारखी मेहनत घेतली, पण सरपंचाची निवडणूक एखाद्या 20-20 मॅच सारखी आहे. काही मिनिटांतच निकाल (आणि निक्काल देखील) लावणारी! यामुळे निकालानंतर जादा खुशी थोडा गम असे चित्र राहणार आहे. ग्रामपंचायत परिसरासह 164 गावे, कारभारी, सदस्य, कार्यकर्ते गुलालाने माखलेले, ढोल ताश्यांचा (बहुतेक ठिकाणी बेंजो पार्टी) निनाद आसमंतात टिपेला पोहोचलेला राहणार. त्यावर (दिवसाच) धुंद होऊन नाचणारे कार्यकर्ते, असे चित्र राहणारच, पण थोड्या फरकाने पराभूत होणारे उमेदवार, सूत्रधार हे गावापासून दूर मोजक्या पाठीराख्यासह आपले दुःख व्यक्त करणार, लाल रंग इकडेही राहणार पण, तो गम विसरायचा राहील…
भिंगारामध्ये नो गुलाल…
दरम्यान, 527 पैकी 526 सरपंचच निवडले जाणार आहे, याचे कारण भिंगारा ग्रामपंचायतमध्ये सदस्य पदाकरिता एकही अर्ज आला नव्हता. यामुळे सरपंच निवडीचा व गुलालाचा सवालच नाय! काही गावात थोडाच गुलाल उधळला जाणार आहे, याचे कारण जे आरक्षण निघाले त्या संवर्गातील सदस्यच निवडून आला नाय! वानगीदाखल देऊळघाटचे (ता. बुलडाणा) आरक्षण अनुसूचित जाती महिला असे निघाले असून तिथे या संवर्गातील पुरुषच निवडून आलेय! अशा ठिकाणी केवळ उप सरपंचच निवडले जाणार आहे. यामुळे गुलालाची उधळण कमी अन् गुलालाचा रंग फिका राहणार.
अधिकृत कार्यक्रम
सकाळी 10 ते 12 दरम्यान नामांकन, 2 वाजता सभा सुरू, 2 ते 2ः20 छाननी व विथड्रॉल, हात उंचावून मतदान.
अनधिकृत कार्यक्रम
अनेक ठिकाणी सहलीवर गेलेले सदस्य काल रात्रीला तालुका वा जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झाले. शेवटची रात्र असल्याने व कडाक्याची थंडी असल्याने त्यांची फुल्ल टू सरबराई करण्यात आली. आता त्यांचे रथ दोन वाजताच्या आसपास थेट सभेच्या ठिकाणीच दाखल होणार आहेत. त्यांना (भावी सरपंचकृत) एस+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे.