2 दिवस सौम्य अन्‌ आज कडssक! जिल्ह्यात 1218 पॉझिटिव्ह रुग्‍णांची भर; 10 तालुक्यांत विस्फोट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे’ ही मायबोलीतील म्हण आहे. कोरोना ऊर्फ कोविडने जिल्ह्याला मागील 2 दिवसांत असाच गुंगारा दिला. सलग 2 दिवस 660 च्या आसपास अन् आज एकदम 1218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत! याला कोरोना ऐसे नाव! हा कोरोना असाच हाय; एखाद्या डुख धरलेल्या जखमी कोब्रासारखा! सोडणार नाय म्हणजे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : दाखवायचे दात वेगळे अन्‌ खायचे दात वेगळे’ ही मायबोलीतील म्हण आहे. कोरोना ऊर्फ कोविडने जिल्ह्याला मागील 2 दिवसांत असाच गुंगारा दिला. सलग 2 दिवस 660 च्या आसपास अन्‌ आज एकदम 1218 पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले आहेत!

याला कोरोना ऐसे नाव! हा कोरोना असाच हाय; एखाद्या डुख धरलेल्या जखमी कोब्रासारखा! सोडणार नाय म्हणजे नाय. यामुळे 29 एप्रिलला 620 अन्‌ 28 एप्रिलला 662 बाधित अशा कमी रुग्णसंख्येने साधेभोळे जिल्हावासी सुखावले. मात्र जाणकारांना ‘तो पुन्हा येईल, जोरदार येईल, दमदार येईल’ याची ग्यारंटी होती. झालेही तसेच. 1218 पॉझिटिव्हचा स्कोअर करत प्रशासन व आरोग्य यंत्रणांना त्‍याने हादरविले! गत्‌ 24 तासांत मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती असून, रुग्ण संख्या पावणे दोनशेच्या घरात (171) पोहोचली आहे. देऊळगाव राजामधील संख्या 112 वर येऊन पोहोचल्याने या 2 तालुक्यांतीलच संख्या 283 वर जाऊन टेकली!  आज जिल्ह्यात आघाडीवर असणाऱ्या लोणारमध्ये हाच आकडा 179 वर येऊन ठेपला तर मेहकरात 88 रुग्ण आढळले. बुलडाणा 104 व मोताळा 112 या  दोन तालुक्यातील संख्या अशीच घाबरविणारी  आहे. मलकापूर 135, नांदुरा 51, जळगाव जामोद 96, शेगाव 45 असा कोरोना सर्वत्र धावतोय. यामुळे चिखली 24 व संग्रामपूर 3 या तालुक्यांचा दिलासा मानायचा का असा सवाल आजच्या कोरोना अहवालाने उपस्थित केला आहे, अर्थात त्याचे उत्तर नाही असेच आहे.

आणखी 4 दगावले…

दरम्यान, बाधित रुग्ण कमी व जास्त असो, रोज रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. गत 24 तासांत चौघेजण दगावले. बुलडाणा येथील महिला रुग्णालयामधील 2, लद्धड हॉस्पिटल आणि सिंदखेडराजा येथील जिजाऊ रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.