2 लाखांवर मतदार केंद्राकडे फिरकलेच नाय! 8 तालुक्यांत अपेक्षेपेक्षा कमी मतदान!! मतदारांचा आळस की कार्यकर्ते पडले कमी?

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदानानंतर यंत्रणांनी व्यक्त केलेला मतदान टक्केवारीचा अंदाज ऐकून प्रसिद्धी माध्यमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली! ही शंका दुहेरी होती, प्रचाराचा झंझावात लक्षात घेतला तर खरोखरच 77 टक्के असे काहीसे कमी मतदान होईल का? ही पहिली शंका होती. एरवी लोकसभेपासून सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत भरभरून अगदी 80 टक्क्यांपर्यंत मतदान करणारे ग्रामीण …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदानानंतर यंत्रणांनी व्यक्त केलेला मतदान टक्केवारीचा अंदाज ऐकून प्रसिद्धी माध्यमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली! ही शंका दुहेरी होती, प्रचाराचा झंझावात लक्षात घेतला तर खरोखरच 77 टक्के असे काहीसे कमी मतदान होईल का? ही पहिली शंका होती. एरवी लोकसभेपासून सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत भरभरून अगदी 80 टक्क्यांपर्यंत मतदान करणारे ग्रामीण मतदार मतदानाबद्दल खरोखरंच उदासीन राहिले असतील का?? अशी दुसरी शंका होती. टक्केवारी अंतिम होईपर्यंत हा अंदाज, कार्यकर्ते, मतदारांपर्यंत पोहोचल्याने टक्केवारी अंतिम होईपर्यंत शंकांचा माहौल गडद होत गेला… या पार्श्‍वभूमीवर अंतिम आकडे हाती (मोबाइलवर) आल्यावर कुशंकाच खर्‍या ठरल्याचे दिसून आले.

यंदा 13 तालुक्यांतही 80 टक्के मतदानाचा व्यापक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दुपारी 3ः30 वाजेपर्यंत मतदानाने 63 टक्केच आकडा गाठल्याने या अंदाजाला पाठबळ मिळाले. मात्र अखेर 5 तालुक्यांतच हा अंदाज खरा ठरला. 8 तालुक्यांनी हा अंदाज चुकीचा ठरविला! सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या मलकापूर (82.48 टक्के), शेगाव (81.92 टक्के), नांदुरा (80.58 टक्के), मेहकर (80. 95 टक्के) व खामगाव (79.65 टक्के) या तालुक्यांनीच 80 चा आकडा गाठला. उर्वरित 8 तालुक्यांत 72 ते 78 टक्के दरम्यान मतदानाची नोंद झाली. यामुळे या तालुक्यातील कार्यकर्ते, उमेदवार, पदाधिकारी, गाव पुढारी कमी पडलेच पण मोठ्या संख्येने बूथपासून दूर राहणारे मतदारदेखील या घसरणीला जास्त जबाबदार आहेत.

9 लाख 70 हजार 667 पैकी तब्बल 2 लाख 19 हजार 738 ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविणे धक्कादायकच ठरावे! 1 लाख 18 हजार 311 महिला व 1 लाख 1 हजार 427 पुरुष मतदारांनी ही उदासीनता दाखविली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हा आकडा खूप मोठा, चिंता वाढविणारा आणि चिंतनास भाग पाडणारा आहे.