25 लाख बुलडाणेकरांनो, यंदा घरीच ‘उधळा आपले रंग’! रस्त्यांवर गोंधळ केल्यास होईल कडक कारवाई!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यंदा होळी सणावरही कोरोनाचे सावट असल्याने जे काही रंग उधळायचे ते घरीच उधळा, असे आदेशच निघाल्याने होळीचा रंग एकदमच फिका किंबहुना बेरंग होणार आहे. ‘होली, कब की है होली’? हा सदाबहार शोले फीलममधला सदाबहार डायलॉग! वसंत ऋतूची चाहूल लागली अन् भिंतीवरचे कॅलेंडर मार्च एन्डकडे वाटचाल करायला लागले …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः यंदा होळी सणावरही कोरोनाचे सावट असल्याने जे काही रंग उधळायचे ते घरीच उधळा, असे आदेशच निघाल्याने होळीचा रंग एकदमच फिका किंबहुना बेरंग होणार आहे.

‘होली, कब की है होली’? हा सदाबहार शोले फीलममधला सदाबहार डायलॉग! वसंत ऋतूची चाहूल लागली अन्‌ भिंतीवरचे  कॅलेंडर मार्च एन्डकडे वाटचाल करायला लागले की 25 लाख जिल्हावासीयांच्या मनात व चर्चेत हा सवाल येतोच! मग रंगपंचमीच्या अंगावर टाकायच्या अन्‌ त्यापेक्षा जास्त अंगात ( पोटात) घ्यावयाच्या रंगील्या द्रव्याची, नॉन व्हेजचे प्लॅनिंग सुरू होते अन्‌ रंगपंचमीला चौकाचौकात, सार्वजनिक स्थळी रंग रंग रंगील्या पद्धतीचे धिंगाणाचे जाहीर बेधुंद प्रदर्शन होते. पण यंदा असे काही न केलेलेच बरे! याचे कारण जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज  ‘पच्चीस’ तारखेच्या (पक्के पच्चीस असलेल्यांसाठी अशुभ, काळ्या ) मुहूर्तावर काढलेल्या आदेशात घरीच होळी साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 23 ते 31 मार्च दरम्यान जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश निगर्मित करण्यात आले आहेत. यामुळे 28 मार्चला होळी घरीच पेटवून मर्यादित बोंबा माराव्या लागणार आहेत. तसेच धुलिवंदनला घरीच ( पोलिसांपेक्षा कडक) ‘होम मिनिस्टर’ च्या निगरानीखाली रंगिली मांसाहारी होळी साजरी करावी लागणार आहे. यामुळे सार्वजनिक स्थळी दांगडू केल्‍यास  विविध कलमाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा दम आदेशातून भरण्यात आला आहे.