36 वर्षीय महिलेला मध्यप्रदेशात विकले; 25 वर्षीय युवकासोबत लावले लग्न; मध्यप्रदेशातील आरोपीसह बुलडाण्यातील 5 जण ताब्यात; बुलडाणा पोलिसांनी वाचा कशी केली सुटका…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील 36 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिची विक्री मध्यप्रदेशात करत 25 वर्षीय तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले. बुलडाणा शहर पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका करत मध्यप्रदेशातील तिच्या त्या पतीसह बुलडाण्यातील 5 जणांना अटक केली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील सरस्वतीनगरात राहणारी 36 वर्षीय महिला ही …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील 36 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिची विक्री मध्यप्रदेशात करत 25 वर्षीय तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले. बुलडाणा शहर पोलिसांनी या पीडित महिलेची सुटका करत मध्यप्रदेशातील तिच्या त्या पतीसह बुलडाण्यातील 5 जणांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील सरस्वतीनगरात राहणारी 36 वर्षीय महिला ही विष्णूवाडीतील केदार राजोरिया यांच्याकडे धुणीभांड्याचे काम करत होती. तिचा 18 वर्षीय मुलगा सुद्धा केदार यांच्याकडे पावभाजीच्या गाडीवर कामाला होता. पीडित महिलेला पतीने सोडून दिल्याचे समजते. गेल्या 3 महिन्यांपासून पीडित महिला केदार यांच्याकडील काम सोडून गेली होती. तेव्हापासून महिलेचा फोन स्वीच ऑफ होता. याबाबत केदार यांनी पीडित महिलेच्या मुलाकडे चौकशी केली असता काही महिलांसोबत बाहेरगावी गेली असल्याचे त्याने सांगितले.
असा लागला पीडितेचा शोध…
4 फेब्रुवारी 2021 रोजी पीडित महिलेने मुलाच्या फोनवर संपर्क केला. मुलाने फोनवर केदार यांनाही कॉन्फरन्सवर घेतले. विवाहितेने सांगितले, की शोभा पैठणे (रा. केशवनगर, बुलडाणा) या महिलेने तिला पुष्पा महाले व राजू महाले (रा. संगम तलाव परिसर, बुलडाणा) व दीपाली डोंगरे (रा. येळगाव, ता. बुलडाणा) या तिघांसोबत नांदेड येथे देवदर्शनासाठी पाठविले. मात्र नांदेडला न जाता तिला परभणी जिल्ह्यातील एका खेड्यात व ओसाड जागेवर नेले. तेथून मध्यप्रदेशातील नागदा या ठिकाणी पाठविले. तिथे पप्पू मेहेर (25) याच्यासोबत तिचे लग्न जबरदस्ती लावण्यात आले. त्यानंतर तिला मध्यप्रदेशातील कंदारा खेडी येथे नेण्यात आले. कंबरखेडच्या पप्पू मेहरच्या घरात मागील तीन महिन्यांपासून ती कैद होती. पप्पू आणि त्याच्या घरची मंडळी तिला त्रास देत होती. पीडितेचा फोन जप्त करून तिची नियमित झाडाझडती घेतली जात असल्याचे तिने फोनवर सांगितले. हे कॉल रेकॉर्डिंग केदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना दाखवले. श्री. बरकते यांनी यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांना पथक बनवण्याचे आदेश दिले. 10 फेब्रुवारीला पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. काल, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी महिलेची सुटका करून आरोपी पप्पूला जेरबंद करून आज पहाटे पोलीस पथक बुलडाण्यात दाखल झाले.
…यांनी केली सुटका
मध्यप्रदेशात पीडित महिलेची सुटका करण्यासाठी ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकात पो.ना. रवींद्र हजारे, पोलीस कर्मचारी प्रशांत मोरे आणि महिला पोलीस कर्मचारी सुनिता खंडारे यांचा समावेश होता. याप्रकरणी बुलडाणा पोलिसांना मध्यप्रदेशातील सोयकतला पोलीस स्टेशनचे ठाणेदार आर. एस. कटारे, पोलीस कर्मचारी राकेश राठोड आणि जीवन बामनिया यांचे सहकार्य लाभले.