बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

4 केंद्रांवरील ड्राय रन ठरली महायशस्वी!; आरोग्य यंत्रणांचे श्रम सार्थकी

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणाचा निर्णायक टप्पा असलेली ड्राय रन अर्थात रंगीत तालीम सर्वार्थाने महा यशस्वी ठरलीय! आज, 8 जानेवारीला जिल्ह्यातील 4 केंद्रांवर पार पडलेली ही अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक तालीम नियोजनानुसार काटेकोरपणे पार पाडण्याच्या कठीण परीक्षेत आरोग्य यंत्रणा उत्तीर्ण झाल्या. यामुळे पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनाने समाधानाचा व सुटकेचा श्‍वास सोडला.यासाठी बुलडाणा जिल्हा रुग्णालय, देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालय, सोनाळा ( ता. संग्रामपूर) व डोणगाव (ता. मेहकर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी 8 ते 11 दरम्यान ही तालीम घेण्यात आली.

देशातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाची ही रंगीत तालीम असल्याने दस्तुरखुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, डीएचओ डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यासह प्रत्येक केंद्रांवर नियुक्त 25 कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर यांच्या दिल की धडकन तेज झालेली होती. त्यातच राज्यस्तरीय यंत्रणासह पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, आरडीसी दिनेश गीते यांची  तालीमवर करडी नजर असल्याने  त्यांची धाकधूक वाढणे स्वाभाविकच ठरले! मात्र प्रत्यक्ष तालमी प्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापली भूमिका चोख बजावल्याने त्यांचे कठोर प्रशिक्षण, परिश्रम सार्थकी लागले.

अशी झाली तालीम…

दरम्यान आजच्या तालमीत प्रत्यक्ष लसीकरणाची झलक पहावयास मिळाली. यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या 25 लाभार्थ्यांना प्रतीक्षालयात माहिती देण्यात येऊन त्यांच्या ओळखपत्राद्वारे त्यांची ओळख पटविण्यात  आली. त्यानंतर त्यांना लसीकरण कक्षात नेण्यात आले. त्यांना लस, संभाव्य परिणाम, लक्षणे यांची माहिती देण्यात आल्यावर उजव्या हाताच्या दंडाला लस देण्यात आली. लसीचा दुसरा डोस पुढील 28 दिवसांनंतर डाव्या हाताच्या दंडाला देण्यात येईल व त्याचा तुम्हाला मेसेज येईल, असे सांगून  निरिक्षण कक्षात अर्धा तास बसविण्यात आले. यावेळी उपस्थित सीएस डॉ. तडस यांनी लसीकरण केंद्राजवळ ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गंभीर लक्षणे असल्यास अंड्रीलेशिन व हायड्रॉकोर या लस राहणार आहेत. यात गंभीर लक्षणांची टक्केवारी खूपच कमी असल्याचे ते म्हणाले. चक्कर येणे हा इंजेक्शनविषयी भीतीचा मनात रुजलेला परिणाम असतो. जिल्ह्याला कोवक्सिन किंवा कोविशिल्ड यापैकी कोणती लस मिळणार याचा निर्णय 15 दिवसांत होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

पहिल्या टप्प्यात साडेतेरा हजार कोरोना योद्ध्यांना लस देण्याचे नियोजन आहे. ही लस उणे (मायनस) 80 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा कमी तापमान झाले की त्याची सूचनावजा माहिती सीएस, निवासी आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पातळीवर तात्काळ मिळण्याची सुविधा आहे.

डोणगावात अशी रंगली रंगीत तालीम

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः मेहकर तालुक्यातील डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जीवन विकास कॉन्व्हेटमध्ये रंगीत तालीम रंगली. प्रभारी जिल्हधिकारी प्रमोदसिंह दुबे, मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरतापे, डोणगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गवई, डॉ. किशोर बिबे, डॉ. उमेश निमदेव, डॉ. सरदार, डॉ. विडोळे, आरोग्य सहायक डॉ. बळी, आरोग्य सहाय्यक काळदाते, तलाठी शिवप्रसाद म्हस्के, श्रीमती गुंठेवार, ग्रामसेवक ज्ञानेश्‍वर चनखोरे, पोलीस अशोक नरुटे यांच्यासह सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका आदींची उपस्थिती होती.

शेगावमध्येही रंगीत तालीम

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोविड लसीकरणाची रंगीत तालीम येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 8 जानेवारी रोजी पार पडली. यावेळी श्री. पिसे, आरती वैद्य, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. ढोकने, मिलिंद कस्तुरे, विजय उमरकर, जोशी आदी उपस्थित होते.

देऊळगाव राजा ग्रामीण रग्णालयातही रंगीत तालीम

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा ग्रामीण रग्णालयातही कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. आस्मा, डॉ. राजमाने, डॉ. मांटे आदी अधिकारी व कर्मचारी हजर होते. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू शिरसाट, गणेशराव बुरुकूल, काशीफ कोटकर, प्रदीप वाघ, रामविजय नरोडे, अरविंद खांडेभराड, आकाश जाधव यांनी रंगीत तालमीची पाहणी केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: