जिल्ह्याचं राजकारणमुख्य बातम्या

527 गाव कारभार्‍यांची फेब्रुवारी मध्यापर्यंत होणार निवड! उपसरपंचांची देखील सोबतच निवड, प्रशासनाची तयारी, गावपुढारी तय्यार!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या हजारो ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांचे लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मात्र मुरब्बी राजकारणी, प्रबळ इच्छुक, मातब्बर गाव पुढारी यांचे लक्ष आणि लक्ष्य केवळ सरपंच पदाच्या निवडीकडे लागलंय. जिल्ह्यातील 527 सरपंच व उपसरपंच पदाची निवड फेब्रुवारी मध्यापर्यंत पार पडेल, अशी शक्यता आहे. आरक्षणानंतर ग्रामीण राजकारण कमालीची गती घेणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर कित्येक महिने चाललेला आणि अजूनही बरेचसे निर्बंध थोपवणारा लॉकडाऊन, ओला दुष्काळ, उद्ध्वस्त खरीप हंगाम, 50 पैशांपेक्षा कमी पीक पैसेवारी या प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यतील 527 ग्रामपंचायतींच्या 4805 जागांसाठीच्या निवडणूक पार पडल्या. निवडणुकीत राजकारणी व मतदारांचा जोश, उत्साह, झंझावाती प्रचार, पैशाचा व मद्याचा महापूर यावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट हे सर्व विसरून सर्व जण लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी झाले. आता सदस्य, गाव पुढारी, कार्यकर्ते, 10 लाखांवर मतदार व ग्रामस्थांचे लक्ष 27 व 29 तारखेला निघणार्‍या सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मात्र जाणकारांचे लक्ष त्यापलीकडे म्हणजे सरपंच निवडणूक वा निवड कधी होते याकडे लागले आहे. आरक्षण काहीही निघो सत्ता आपलीच हवी, या जिद्दीने आता राजकारणाचे डावपेच खेळले जात आहे.
काय आहे प्रावधान?
दरम्यान निवडणूक मतदानानंतर लवकरात लवकर तथापी 30 दिवसांच्या आत घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यामुळे 15 फेब्रुवारीच्या आत सरपंच निवड होणे क्रमप्राप्त ठरते. आता सरपंच निवड निर्वाचित सदस्यांमधून होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत सरपंच निवड होणार आहेच. पण उपसरपंचपदाची सुद्धा निवड होणार आहे. यामुळे ही पहिली सभा कधी लागते हे आरक्षण सोडती इतकेच महत्त्वाचे ठरते. याचे कारण 527 गावांच्या कारभार्‍यांचा फैसला त्यावेळी होणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: