6 हजार हेक्टवरील पिके गारपिटीसह पावसाने नेस्‍तनाबूत!; गहू, हरभऱ्यासह भाजीपाल्याचे नुकसान, कांद्याची नासाडी, आंब्याचा मोहोरही झडला!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 19 मार्चच्या मुहूर्तावर आणि ऐन उन्हाळ्यात लाखो जिल्हावासीयांनी पावसाळ्याचा अनुभव घेतला! वाऱ्यासह व काही ठिकाणी लहान आकाराच्या गारासह झालेल्या या अवकाळी पावसाने सोंगणीला आलेल्या गहू, हरभरा या पिकासह, भाजीपाला प्रामुख्याने कांद्याचे व फळबागांचे नुकसान केले. सुमारे 6 हजार हेक्टवरील पिके गारपिटीसह पावसाने नेस्तनाबूत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 19 मार्चच्या मुहूर्तावर आणि ऐन उन्हाळ्यात लाखो जिल्हावासीयांनी पावसाळ्याचा अनुभव घेतला! वाऱ्यासह व काही ठिकाणी लहान आकाराच्या गारासह झालेल्या  या अवकाळी पावसाने सोंगणीला आलेल्या गहू, हरभरा या पिकासह, भाजीपाला प्रामुख्याने कांद्याचे व फळबागांचे नुकसान केले. सुमारे 6 हजार हेक्टवरील पिके गारपिटीसह पावसाने नेस्‍तनाबूत झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यापेक्षा जास्त नुकसान झाल्याची शक्‍यता आहे. गहू, हरभरा या रब्बी पिकांचे तर कांद्याचे जास्त नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्‍या उच्‍चस्‍तरीय सूत्रांनी सांगितले.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने 19 मार्चच्या संध्याकाळी 6.30 ते रात्री 9 वाजेदरम्यान  हजेरी लावली. झालेला पाऊस रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा होता. जवळपास सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याचे वृत्त आहे. रब्बीमधील प्रमुख पीक असलेल्या गहू, हरभरा या पिकांचे व मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेल्या कांद्याचे जास्त नुकसान झाले आहे. यंदा अनुकूल हवामानामुळे जिल्ह्यातील आंब्याची झाडे मोहोराने बहरली होती. वाऱ्यासह झालेल्या पावसाने हा मोहोर झाडल्याने आंबे उत्पादनात घट येणार आहे.

जिल्ह्यात झालेला पाऊस

बुलडाणा 8.7 मि.मी., चिखली 3.6 मि.मी., मेहकर 2.9 मि.मी, सिंदखेड राजा 1.8 मि.मी., खामगाव 2.2 मि.मी., मोताळा 3.6 मि.मी., नांदुरा 1.3 मि.मी. अन्य तालुक्यात यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

मोताळा, मेहकर, खामगाव, चिखली तालुक्‍याला तडाखा

मोताळा तालुक्यातील कुऱ्हा, पुन्हाई, टाकळी, शेलापूर,  वाघजल , सारोळा, कोऱ्हाळा, खामगाव तालुक्यातील चिंचपूर, पिंप्री कोरडे, शहापूर, ,मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव सर्कल, चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात पावसाचा जोर जास्त होता. तसेच या पट्ट्यात बोरीच्या आकाराच्या गारी पडल्याचे वृत्त आहे. डिडोळा बुद्रूक शिवारात गारपिटीमुळे राजेंद्र शंकर वाघ यांच्‍या शेतातील कांदाबिजोत्पादनाचे 3 एकरातील प्‍लॉटचे नुकसान झाल्‍याचे त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला दूरध्वनीवरून सांगितले.