66 गावांत पाणी पेटले! पाऊण लाख ग्रामस्थांची दैना; टँकर व विहिरीवरूनच तहान भागविण्याची आली वेळ!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच जिल्ह्यातील 66 गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कमीअधिक पाऊण लाख ग्रामस्थांची अडचण होत आहे. त्यांच्यावर तहान भागविण्यासाठी टँकर वा अधिग्रहित विहिरीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात 687 गावांत टंचाई राहणार असा यंत्रणांचा अंदाज आहे. यामुळे 956 विविध उपाययोजनांचा समावेश …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच जिल्ह्यातील 66 गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कमीअधिक पाऊण लाख ग्रामस्थांची अडचण होत आहे. त्यांच्यावर तहान भागविण्यासाठी टँकर वा अधिग्रहित विहिरीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात 687 गावांत टंचाई राहणार असा यंत्रणांचा अंदाज आहे. यामुळे 956 विविध उपाययोजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून यातील 66 गावांत पाणी टंचाईने पेट घेतला. यापैकी 9 गावांत इतर कोणतेही जलस्रोत नसल्याने 9 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पिंपरखेड, ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा (ता. बुलडाणा), असोला तांडा, तांबुळवाडी सैलानीनगर, कोलारा (ता. चिखली), सावरगाव माळ (ता. सिंदखेडराजा) आणि चिंचखेडनाथ इसालवाडी (ता. मोताळा) या गावांचा समावेश आहे. या गावांची लोकसंख्या 17 हजार 374 इतकी आहे.

अर्धा कोटी खर्ची…
दुसरीकडे सध्या टंचाईग्रस्त 57 गावांची तहान अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे भागविली जात आहे. यासाठी 60 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यावर आजअखेर 20 लाख 63 हजार रुपये खर्ची झाले आहेत. टँकरवरील खर्च 32 लाख 22 हजार पर्यंत गेला आहे. यामुळे आजमितीला पाणीटंचाईवर अर्धा कोटी पेक्षा जास्त खर्च झाले आहेत.