बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

85 टक्के कोरोना रुग्ण सामान्य उपचाराने होतात बरे; उरलेल्या 15 टक्‍क्‍यांपैकी 3% गंभीर तर 1 % रुग्णांना ‘आयसीयू’ बेडची गरज; जिल्हा शल्य चिकित्सकांचा ‘Buldana Live’शी संवाद

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 85 टक्के रुग्ण सामान्य औषधोपचाराने कोरोनावर मात करतात करतात. उरलेल 15 टक्‍क्‍यांपैकी 3 टक्के हे गंभीर होतात. त्यातही केवळ 1 टक्का रुग्णांना आयसीयू बेडची आवश्यकता भासते. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी हे सर्व ‘टीमवर्क’ने जिल्ह्याला कोरोनाच्‍या संकटातून बाहेर काढण्यासाठी लढत असून, त्यात नागरिकांनी आणखी जबाबदारी घेऊन वर्तणूक केल्यास जिल्हा कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘बुलडाणा लाइव्ह’शी बोलताना व्यक्त केला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतोय. ऑक्सिजन ,रेमडेसिवीर इंजेक्‍शन, आयसीयू बेडचा तुटवडा या पार्श्वभूमीवर ‘बुलडाणा लाइव्ह’ने त्‍यांच्‍याशी विशेष संवाद साधला.

अशी आहे सज्‍जता…

कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडे सध्या 33 शासकीय कोविड सेंटर आहेत. तसेच जिल्ह्याने 49 खासगी कोविड सेंटरला सुद्धा मान्यता दिली आहे. 49 पैकी 12 सेंटरमध्ये व्हेंटिलेटर तर 37 सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेकडे सद्यःस्थितीत 77 आयसीयू बेड, 55 व्हेंटिलेटर बेड, 923 ऑक्सिजन बेड तर 2435 जनरल बेड कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन 520 बेड लवकरच

जिल्ह्यात विविध ठिकाणी लवकरच 520 बेड उपलब्ध होतील. त्यामध्ये बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक महाविद्यालयात 100 बेड, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात 100 बेड, नांदुरा येथे 50 ऑक्सिजन बेड, जळगाव जामोद येथे 15 आयसीयू बेड, स्‍त्री रुग्णालय बुलडाणा येथील कोविड सेंटरमध्ये 100 बेड तर टीबी हॉस्पिटलमध्ये 150 बेडचा समावेश आहे. याशिवाय खासगी कोविड सेंटरला सुद्धा मान्यता देण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण हलका होणार आहे.

गरजूंना बेड मिळाला पाहिजे…

कोरोना होणारे 85 टक्के रुग्ण हे सामान्य औषध उपचार व विलगीकरणाने बरे होतात. उर्वरित 15 टक्के रुग्णांपैकी 3 टक्के रुग्ण गंभीर होतात तर 1 टक्का रुग्णांना आयसीयू बेडची गरज पडते. मात्र कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर लोक घाबरून बुलडाण्याच्या दिशेने धावतात. ज्यांना ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज सुद्धा लागणार नाही तेही बुलडाण्यात येतात. त्यामुळे ज्यांना खरोखर बेडची आवश्यकता आहे. अशा रुग्णांना बेड मिळणे अवघड होऊन जाते, असेही डॉ. तडस म्हणाले.

…तर ताबडतोब ॲडमिट करावे

कोरोनाची किंवा सामान्य ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे जाणवू लागल्यांतरही अनेक जण हे दुखणे अंगावर काढतात. मेडिकलमधून औषध आणून उपचार घेतात. त्यामुळे आजार वाढत जातो,गंभीर रूप धारण करतो आणि नंतर दवाखान्यात भरती करावे लागते.आजाराची कुठलेही लक्षण जाणवू लागल्यानंतर रॅपिड किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे महत्त्वाचे असते. यामुळे आजाराचे लवकर निदान तर होतेच शिवाय संसर्ग रोखायला सुद्धा मदत होते, असे डॉ. तडस म्‍हणाले.

रोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट!

रोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करून फुफ्फुसांचे आरोग्य तसेच ऑक्सिजन पातळी तपासणी करणे घरातल्या घरात अगदी सहज शक्य आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी करून पाहता येते. सर्दी, ताप, खोकला किंवा अन्य आजारांची कुठलीही लक्षणे जाणवू लागल्यास ही टेस्ट करण्याचे आवाहन डॉ. तडस यांनी केले.

टेस्ट कुणी करावी?

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. (पायऱ्यांवर चालू नये) यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही, तर प्रकृती उत्तम असे समजावे. जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल किंवा चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णाला भरती करावे, असेही जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले.

ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्‍न

सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र ही समस्‍या दूर करण्यासाठी सुद्धा युद्धपातळीवर प्रयत्‍न केले जात आहेत. सध्या शासकीय कोविड सेंटरला 7 ते 8 दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. आजच्या तारखेला जिल्ह्याकडे 922 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. खासगी कोविड सेंटरला रेमडीसीविर पुरवण्याची जबाबदारी सहायक आयुक्त अन्न व द्रव्य विभाग यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय आणि खासगी कोविड सेंटर मिळून जिल्ह्याची दररोज 13 ते 17 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. मात्र सध्या जिल्ह्याला 10 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने तुटवडा आहे.

ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा होणार स्वयंपूर्ण

जिल्हा स्‍त्री रुग्णालयात प्रगतिपथावर असलेला ऑक्सिजन जनरेशन प्लांट  27 एप्रिलपर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे रोज 80 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. याशिवाय सामान्य रुग्णालय खामगाव आणि ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथेही लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यन्वित होणार आहे. दोन्ही ठिकाणी रोज 85 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. जळगाव जामोद, मेहकर आणि मलकापूर या ठिकाणी सुद्धा भविष्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविण्यात येणार असल्याने जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असल्याचेही डॉ. तडस म्हणाले.

आरोग्य विभागाची भरती

1135 जागांसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता त्यापैकी सध्या जिल्ह्याला 213 जागांची मान्यता मिळाली आहे. उर्वरित जागांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘त्या’ मॅसेजला शास्‍त्रीय आधार नाही…

रक्ताचा तुटवडा असल्याने 1 मेपूर्वी किंवा लसीकरण करण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करावे. कारण लस घेतल्यानंतर 2 महिने रक्तदान करता येत नाही, असा मॅसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, याबाबत डॉ. तडस यांना विचारणा केली असता याला कुठलाही वैद्यकीय शास्‍त्रीय आधार नसल्याचे ते म्हणाले. लस घेतल्यानंतर सुद्धा तरुणांना रक्तदान करता येणार असल्याचे ते म्हणाले.

मीच जबाबदार..!

मास्क, वारंवार हात धुणे आणि शारीरिक दुरीच्या नियमांचे पालन करून मीच जबाबदार या भूमिकेत नागरिकांनी वावरले पाहिजे. अजूनही मास्कच्या बाबतीत लोक गांभीर्याने घेत नाही ही खेदाची बाब आहे. 1 मेनंतर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनसुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: