9 जण दगावले; 957 पॉझिटिव्ह! कोरोनाचा 4 तालुक्यांना शतकीय तडाखा!! 12 तालुक्यांत कोविडचा धुमाकूळ

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शुक्रवारच्या तुलनेत आज, 8 मे रोजी कोरोना बाधितांचा आकडा दोनेकशेने कमी असला तरी गत् 24 तासांत जिल्ह्यात 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचा जिल्ह्यातील झंझावात कायम असल्याचे चित्र आहे. 4 तालुक्यांतील शतकापार पोहोचलेले आकडे हे सिद्ध करायला पुरेसे आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्हचा आकडा 1103 वर पोहोचला होता. या तुलनेत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शुक्रवारच्या तुलनेत आज, 8 मे रोजी कोरोना बाधितांचा आकडा दोनेकशेने कमी असला तरी गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचा जिल्ह्यातील झंझावात कायम असल्याचे चित्र आहे. 4 तालुक्यांतील शतकापार पोहोचलेले आकडे  हे सिद्ध करायला पुरेसे आहेत.

शुक्रवारी पॉझिटिव्हचा आकडा 1103 वर पोहोचला होता. या तुलनेत आज किंचित कमी म्हणजे 957 चा आकडा सामोरे आलाय! खामगाव 140 रुग्णांसह आघाडीवर आहे. याखालोखाल देऊळगाव राजा 133, मेहकर 120, बुलडाणा 111 अशी भीषण आकडेवारी आहे. अर्थात इतर तालुके फारच मागे आहे असे नाहीच! मध्यंतरी शांत असलेल्या शेगावमध्ये 72 रुग्ण निघाल्याने तालुक्यातून कोरोनाने काढता पाय घेतला नाही, हे स्पष्ट होते. मलकापूर 70, नांदुरा 51, मोताळा 45, जळगाव जामोद 62, सिंदखेडराजा 75, लोणार 50 या तालुक्यांतील कोविडचे थैमान कायम असल्याचे दर्शवणारे हे आकडे आहेत.

बळी पावणे पाचशेच्या घरात

या तुलनेत चिखली 24, संग्रामपूर 4 या तालुक्यातील कोरोनाचा प्रकोप कमी असल्याचे चित्र आहे. मात्र चिखलीत कोरोना कधीही कमबॅक करू शकतो, हे तेवढेच खरे. दुसरीकडे मृत्यूचे थैमान देखील कायम आहे. गत 24 तासांत 9 जण दगावल्याचे वृत्त आहे. बुलडाणा येथील महिला रुग्‍णालयामधील 3, मलकापूर सामान्य रुग्णालय व देऊळगावराजा ट्रामा केअर युनिटमधील प्रत्येकी 2 तर खामगाव सामान्य रुग्णालय व शेगाव सामान्य रुग्णालयामधील प्रात्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.