Big Breaking! ऑनलाइन पद्धतीने सादर झाले जिल्‍हा परिषदेचे ‘बजेट’, 21 कोटींचे मूळ अंदाजपत्रक; आर्थिक संकटाचे सावट

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् वर्षभरापासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या व जिल्ह्याचेच बजेट बिघडविणाऱ्या कोविडकृत आर्थिक संकटाचे व मर्यादित उत्पन्नाचे सावट बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आज, 25 मार्चला दुपारी सादर झालेल्या सन 2021- 22 च्या अर्थ संकल्पावर दिसून आले. कोरोना संकटामुळे बजेटची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गत्‌ वर्षभरापासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या व जिल्ह्याचेच बजेट बिघडविणाऱ्या कोविडकृत आर्थिक संकटाचे  व मर्यादित उत्पन्नाचे सावट बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आज,  25 मार्चला दुपारी सादर झालेल्या सन 2021- 22 च्या अर्थ संकल्पावर दिसून आले. कोरोना संकटामुळे बजेटची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाझ खान पठाण यांनी दुपारी 2 वाजताच्या आसपास सुरू झालेल्या ऑनलाइन बैठकीत  जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल जालिंदर बुधवत, महिला बाल कल्याण सभापती ज्योति अशोक पडघान, समाजकल्याण सभापती पूनम राठोड, कृषी सभापती राजेंद्र पळसकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, मुख्य वित व लेखा अधिकारी शिल्पा पवार आदी हजर होते. बैठकीच्या प्रारंभी रियाझ खान पठाण यांनी प्रास्तविकपर अभिभाषण केले. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व समाज घटक व विकास कामांसाठी पुरेपूर तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सन 2021-22 चे मूळ अंदाज पत्रक 21 कोटी3 लाख 16 हजार 593 तर 20-21 चे सुधारित अंदाजपत्रक 30 कोटी 39 लाख,50 हजार 798 रुपये इतके करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

हायलाईट्स…

  • समाज कल्याण विभागासाठी उत्पन्नाच्या 20 टक्के निधी.
  • महिला बाल कल्याणसाठी 1कोटी 37 लाखांची तरतूद.
  • कृषी विभागासाठी 1 कोटी 1 लाख तर पशुसंवर्धनसाठी 1 कोटी 9 लाखांची तरतूद
  • स्मार्ट व्हिलेज जनसुविधासाठी 1 कोटी 15 लाखांचा निधी
  • आरोग्य विभागासाठी 1कोटी 17 लाख
  • रस्ते, पूल, नाले यासाठी दीड कोटी
  • ग्रामीण पाणी पुरवठा योजना दुरुस्ती साठी 20 टक्के निधी
  • दिव्यांग कल्याणासाठी 5 टक्के
  • शिक्षण विभागासाठी 1 कोटी 19 लाखांची तरतूद

कोविडमुळे सर्व झाले झूम…

दरम्यान कोरोनाचा भीषण प्रकोप  व शासनाचे निर्देश लक्षात घेता सर्व पदाधिकारी व सदस्य  ‘ झूम अप’ द्वारे बैठकीत व चर्चेत सहभागी झाले. जिल्ह्यातील 13 पंचायत समितींमध्ये यासाठी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली. संबंधित तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य त्या त्या पंचायत समिती मध्ये उपस्थित होते. यामुळे बैठकी दरम्यानची चर्चा , खडाजंगी, टीका टिपण्णी सर्व ऑनलाइनच रंगले!