Big Breaking… केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल; किमान 4 दिवस राहणार, जिल्ह्यातील कोरोना सुविधा व उपचारांची घेणार झाडाझडती!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्ह्यात केंद्रीय पथक डेरेदाखल झालेय! हे द्विसदस्यीय तज्ज्ञांचे पथक जिल्ह्यात किमान 4 दिवस मुक्कामी राहणार असून, जिल्ह्यातील कोरोनाविषयक सर्व बाबींचा सविस्तर आढावा किंबहुना झाडाझडती घेणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांत अघोषित हाय अलर्ट जाहीर झाला आहे. मार्च मध्यावर पुन्हा जिल्ह्यात …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्ह्यात केंद्रीय पथक डेरेदाखल झालेय! हे द्विसदस्यीय तज्‍ज्ञांचे पथक जिल्ह्यात किमान 4 दिवस मुक्कामी राहणार असून, जिल्ह्यातील कोरोनाविषयक सर्व बाबींचा सविस्तर आढावा किंबहुना झाडाझडती घेणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांत अघोषित हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

मार्च मध्यावर पुन्हा जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात सर्वदूर हातपाय पसरले आहेत. अलीकडे पॉझिटिव्ही दर आणि मृत्यू संख्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज केंद्रीय (पाहणी) पथक दाखल झाले. यात एनसीडीएल ( उप संचालक, नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल, दिल्ली) आणि दष्टी सुंदरदास (असिस्टंट प्रोफेसर, एम्स ,भुवनेश्वर , ओडिशा) यांचा समावेश आहे.  या दोघा तज्‍ज्ञांनी आज, 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्‍हाधिकारी दिनेश गीते, सीएस डॉ. नितीन तडस, डीएचओ डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी अधिकारी हजर होते. बैठकीत त्यांनी रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण संख्या, उपलब्ध आरोग्य सुविधा, त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार,  चाचण्यांचा वेग व संख्या, लसीकरण, मृत्यू दर, कंटेन्मेंट झोन, विविध आस्थापना, नमुने संकलन व  तपासणी याचा तपशीलवार आढावा घेतला. यानंतर पथकाने बुलडाणा शहरातील महिला रुग्णालय, अपंग विद्यालय कोविड सेंटर, तपासणी प्रयोग शाळा, ऑक्सिजन टॅंक व अन्य आरोग्य आस्थापनांची पाहणी केली. हे पथक  4 ते 5 दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहून सामान्य रुग्णालये, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कोविड केअर सेंटर्स व अन्य आरोग्य आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. तसेच आरोग्य सुविधा, मनुष्यबळ यांचाही आढावा घेऊन पाहणी अंती मार्गदर्शनपर निर्देश देणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.