बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Breaking ! सोमवारी निर्णायक बैठक!! पालकमंत्र्यांसह 6 आमदारांना निमंत्रणे!; ‘लॉकडाऊन’ निर्णयाच्‍या शक्‍यतेमुळे जिल्ह्याचे लागले लक्ष!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनाच्‍या प्रकोपामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा जेरीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व जिल्ह्यातील 6 आमदारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक 5 एप्रिल रोजी आयोजित केली आहे. जिल्ह्यासह राज्यात कडक लॉकडाऊनची अफवारूपी चर्चा शिगेला पोहोचली असतानाच ही बैठक आतापासूनच लक्षवेधी ठरली आहे.

जिल्ह्यात कोविडने धुमाकूळ घातला असून, 2 एप्रिल ते 27 मार्च दरम्यानच्या अल्पावधीतच 5 हजार 114 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातही बुलडाणा, खामगाव हे तालुके हॉट स्पॉट ठरले असून चिखली, मलकापूर, शेगाव, देऊळगावराजा या तालुक्यातील उद्रेक गंभीर आहे. संग्रामपूर वगळता अन्य तालुकेही मागे नाहीत. पूर्वी दर शुक्रवारी होणारी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक दररोज होत आहे. पालकमंत्री नियमित आढावा घेतात तो वेगळाच!

या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी विशेष आढावा बैठक आतापासूनच प्रशासकीय वर्तुळ ते सर्वसामान्यांचे लक्ष वेधणारी व भीतीयुक्त उत्सुकता वाढविणारी ठरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी 3 वाजता ही बैठक लावण्यात आली आहे. यावेळी कोरोनाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र  हा जाहीर अजेंडा असला तरी बैठकीत संभाव्य लॉकडाऊनवर चिंतन, मनन होण्याची व लोकप्रतिनिधींची त्यावर काय भूमिका यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे बैठकीबद्दल जिल्ह्यात सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उलट सुलट चर्चा रंगणार व तर्कतितर्क लावले जाणार हे उघड आहे.

आमदारांची पोच घ्या…

दरम्यान बैठकीस आमदार संजय रायमूलकर, संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेताताई महाले, संजय गायकवाड व राजेश एकडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना बैठकीच्या पत्राची पोच देण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पत्र दिल्याची पोच जिल्हाधिकारी कार्यालयात (आरडीसींना?) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ही बैठक किती महत्वपुर्ण आहे याची पुष्टी होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: