बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live इफेक्‍ट : कोविड सेंटरमधील असुविधांवर आढावा बैठकीत खल; पालकमंत्र्यांनी दर्जा सुधारण्याच्‍या केल्या सूचना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्‍हने दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटरमधील रुग्‍णांच्‍या गैरसोयीबद्दल वृत्त प्रकाशित केल्‍यानंतर त्‍याची दखल प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधीस्‍तरावरही घेण्यात आली आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्याच्‍या दिवशीच विभागीय आयुक्‍तांनी प्रशासकीय यंत्रणेला सुविधा आणि जेवणाच्‍या दर्जाबद्दल सूचना केल्या होत्‍या. आढावा बैठकीतही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासकीय यंत्रणेला कोविड सेंटरमधील सुविधांचा दर्जा चांगला ठेवण्याची सूचना केली. दिवसागणिक रुग्णांची वाढ दिसून येत असून, जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते. यावर्षी होणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्याच्या सूचना करत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे. कुठेही यात्रा आयोजित करण्यात येऊ नये. ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याठिकाणी असलेले तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी टाकावी. रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचणी वाढवावी. तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी करावी. कोविड केअर सेंटरवर रुग्ण असो की नसो कर्मचारी कार्यरत ठेवावे. येत्या तीन दिवसांत बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच हिवरा आणि नांदुरा येथील सीसीसी सेंटर तातडीने सुरू करावे. ते म्हणाले, की जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. भविष्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे यंत्रणेने तयारीत राहावे, लस घेतली म्हणजे कोविड संसर्ग नियमांपासून दूर पळू नये. त्यामुळे लस घेणाऱ्याने देखील त्रिसूत्रींचा अवलंब करावा, तसेच सर्व जनतेने देखील त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच रक्त पुरवठा, लसीकरणाचा आढावाही घेतला. लसीकरण करताना उन्हाळयाचे दिवस असल्याने लसीकरणासाठी वयोवृद्ध लोक येणार असून त्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये. लसीकरण ठिकाणी पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.


महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र

जागतिक महिला दिनानिमित्ताने 8 मार्च रोजी आरोग्य विभागाने महिलांचा विशेष सन्मान करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विभागाने कोविड लसीकरणाला येणाऱ्या महिलांकरीता विशेष केंद्रांची व्यवस्था केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने या केंद्रांवर शासनाच्या निकषांनुसार 60 वर्षावरील व 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन पात्र महिला लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. बुलडाणा तालुक्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष लसीकरण सत्र असणार आहे. तसेच चिखलीसाठी ग्रामीण रुग्णालय चिखली, देऊळगाव राजा तालुक्याकरिता ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, जळगाव जामोद तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मडाखेड, खामगावसाठी सामान्य रुग्णालय खामगाव, लोणार तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुलतानूपर येथे विशेष लसीकरण सत्र असणार आहे. मलकापूर तालुक्याकरिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे, मेहकरसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव, मोताळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी, नांदुरा तालुक्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा, शेगाव तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आडसूळ येथे, संग्रामपूर तालुक्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा आणि सिंदखेड राजा तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे महिलांना लसीकरणाचे सत्र असणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे यांनी कळविले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: