बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live ची बातमी ठरली खरी!; सोमवार ते शुक्रवार दुकाने रात्री 8 पर्यंत राहणार सुरू, धार्मिक स्थळे बंदच, वाचा जिल्हाधिकारी काय म्‍हणालेत नव्या आदेशात…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सुधारित निर्बंध लागू करण्याचे निर्देश सरकारकडून आले आहेत. त्यानुसार आधीच्या निर्बंधात शिथीलता आणून नवीन निर्बंध 3 ऑगस्टच्‍या सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी लागू केले आहेत.

या आदेशानुसार सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित दुकाने, आस्थापना तसेच सर्व प्रकारची बिगर जिवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, आस्‍थापना, शॉपिंग मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहतील. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू असतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी अत्यावश्यक सेवेची वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहतील. व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग, सायकलींगसाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक बगीचे, खेळाची मैदाने सुरू राहतील. सर्व प्रकारची शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्या कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे, त्यांना ही सुविधा सुरू ठेवता येतील. सर्व प्रकारची कृषी विषयक कामे, नागरी कामे, औद्योगिक कामे, मालाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील.

वातानुकूलित सेवा वगळून व्यायामशाळा, योगा केंद्र, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा आदी एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू व रविवारी बंद राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टीप्लेक्सेस (स्वतंत्र आणि मॉल्सच्या आतील) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. राज्य शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागांचे आदेश शाळा व महाविद्यालयांसाठी लागू राहतील. सर्व प्रकारचे रेस्टॉरंट एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत तसेच शनिवार व रविवार या दिवशी केवळ पार्सल / टेक अवे व घरपोच सेवा सुरू राहील. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता हालचालींना निर्बंध राहतील.

गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक, प्रचार, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे आदींवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. सर्व ठिकाणी आवश्यक सामाजिक अंतर पाळण्यासोबतच कोवीड त्रिसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॉनिटायजर किंवा हॅडवॉशने हाताची नियमित स्वच्छता) प्रत्येक नागरिकास बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांच्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्या या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: