बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live effect : अखेर फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण; सिंदखेड राजा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जनावरांना उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्‍यापर्यंत घेऊन जाणे जिकरीचे काम ठरत होते. यात पशुपालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास टाळण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतून सिंदखेड राजा तालुक्‍यासाठी फिरता वैद्यकीय दवाखाना अर्थात मोबाईल व्हॅन उपलब्ध झाली.  मात्र अधिकाऱ्यांच्‍या दूर्लक्षामुळे ही व्‍हॅन आली तशीच पडून होती. बुलडाणा लाइव्‍हने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच ही व्‍हॅन शेतकऱ्यांच्‍या सेवेत आणण्यात आली आहे. त्‍याचे लोकार्पण 21 मार्चला  करण्यात आले. यावेळी बोलताना पशुपालकांसाठी फिरते वैद्यकीय दवाखाना वरदान ठरणार असल्‍याचे प्रतिपादन सिंदखेड राजा पंचायत समितीच्‍या सभापती सौ. मीनाताई गजानन बंगाळे यांनी केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.नाझेर काझी, उपसभापती लता अण्णा खरात, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांची प्रमुख उपस्‍थिती होती. सौ. बंगाळे यांच्या हस्ते फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण झाले. फिरत्या दवाखान्यामुळे ज्या गावात पशुवैद्यकीय दवाखाना नाही अथवा लांब अंतरावर आहे त्या गावातील पशुपालकांना पशु वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी फायदा होणार आहे. रोग प्रतिबंधक लस देणे शक्‍य होणार आहे. विनाविलंब व नाममात्र शुल्कात ही सेवा उपलब्ध होणार आहे. थेट पशुपालकांच्या घरापर्यंत दवाखाना पोहोचणार असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे. आजारी जनावरावर वेळेत उपचार होणार आहे, असे यावेळी सौ. बंगाळे म्‍हणाल्या. यावेळी माजी खासदार सुखदेव काळे, राम राठोड, जगन मामा सहाणे, अण्णा खरात, सीताराम चौधरी, गजानन बंगाळे, संतोष आडे, शेख यासीन, नितीन चौधरी, डॉ. गाडेकर यांच्यासह पशुपालक उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: