क्राईम डायरीमुख्य बातम्या

Buldana Live Exclusive : दोन आमदारांच्‍या युद्धात पोलीस अधीक्षकच ठरले खरे हिरो!; पराकोटीच्‍या संयमाचे घडले आगळेवेगळे दर्शन!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पराकोटीचा संयम राखून जिल्हा पोलीस दल आणि त्‍यांचे ‘लीडर’ (अन्‌ निडरही) अरविंद चावरिया यांनी दोन आमदारांमधील ‘युद्ध’ ज्‍या पद्धतीने शमवले, संपवले याला तोड नाही. परिस्‍थिती बिघडत असतानाही चातुर्याने ती नियंत्रणात आणणे, आपला कल एकीकडे झुकणार नाही याची दक्षता घेत, संभाव्‍य बिकट परिस्‍थितीलाही तोंड देण्यासाठी त्‍याचवेळी काटेकोर नियोजन करणं या कौशल्यांचे दर्शन श्री. चावरिया यांच्‍यानिमित्ताने जिल्हावासियांना झाले.  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं असंही आगळंवेगळं रूप पहिल्यांदाच 18 ते 20 एप्रिलदरम्‍यान बघायला मिळाल्‍याची प्रतिक्रिया सामान्यांनी बुलडाणा लाइव्‍हकडे व्‍यक्‍त केली आहे.

औरंगाबादला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. चावरिया यांनी  केलेल्या कामगिरीची चर्चा अजूनही मराठवाड्यात होत असते. त्‍यांची नियुक्‍ती गेल्‍या वर्षी 18 सप्‍टेंबरला बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्‍हणून झाली. त्‍यांच्‍या नियुक्‍तीची बातमीही सर्वप्रथम बुलडाणा लाइव्‍हने दिली होती आणि ते दाखल होण्याआधी त्‍यांच्‍याशी संवाद साधणारेही प्रथम बुलडाणा लाइव्‍हच होते, हे विशेष. स्वच्छ चारित्र्य अन्‌ कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून अल्‍पावधीत ते जिल्ह्यात लौकिकास प्राप्‍त ठरले आहेत. कोरोना संकटकाळातच बुलडाणा जिल्ह्याच्‍या सेवेसाठी आलेलेल्या श्री. चावरिया यांनी त्यांच्या कार्यशैलीने पोलीस दलातील शिपायापासून तर सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच मने जिंकली आहेत. रखडलेल्या पदोन्नत्‍या त्‍यांनी मार्गी लावून गूड न्‍यूजही मोठ्या प्रमाणावर दिल्या. शांत, संयमी असणारे श्री. चावरिया गुन्हेगारांच्या बाबतीत मात्र तेवढेच कर्तव्यकठोर आहेत.

पराकोटीच्‍या संयमाचे दर्शन…

गेल्‍या तीन दिवसांत बुलडाणा आणि जळगाव जामोदच्या आमदारांमध्ये पेटलेला वाद कोणते वळण घेईल काहीच शाश्वती नव्‍हती. जिल्ह्यात कोरोनाचे वातावरण बिकट असताना, जिल्हा संकटात असताना दोन्‍ही आमदारांमध्ये आरोप-प्रत्‍यारोपाची जणू स्‍पर्धा लागली होती. सोशल मीडियावरील चर्चा त्‍यात भर घालत होत्‍या. बुलडाण्याच्‍या आमदारांचे चॅलेंज स्‍वीकारत बुलडाण्यात आलेले जळगाव जामोदचे आमदार पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले तेव्‍हा आणि बाहेर पडले तेव्‍हा वेगवेगळ्या भूमिकांत दिसून आले. आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्‍यासाठी हा विषय संपला आहे, असेच थेट जाहीर केले. मात्र परतताना झालेल्‍या दगडफेकीमुळे पुन्‍हा तणाव निर्माण झाला होता. थेट हल्ला झाल्‍याने आक्रमक झालेल्या जळगाव जामोदच्‍या आमदारांना त्‍याही परिस्‍थितीत शांत करण्याचे कौशल्य श्री. चावरिया यांनी दाखवले. परिस्‍थिती बिकट होती, आक्रमक सारेच होते, जिल्हाभरातून कार्यकर्ते शहरात दाखल होत होते. तरीही अगदी संयमित भूमिका ठेवत श्री. चावरिया यांनी वातावरणावर नियंत्रण मिळविण्याचे कसब दाखवले. आमदारांना ज्‍या पद्धतीने ते समजावत होते, ते दृश्य तर कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा, याचेच जणू दर्शन घडवत होते. जिल्ह्याच्‍या शांततेसाठी विनंत्‍या करणे, वारंवार समजूत काढणे हे पदाचा अभिनिवेश न बाळगणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच अपेक्षित होते, तेच पोलीस अधीक्षकांनी केल्याचे दिसून आले. मात्र एकीकडे हा पराकोटीचा संयम दिसत असताना त्‍यांनी संभाव्‍य परिस्‍थितीला तोंड देण्याचीही तयारी ठेवली होती, असे म्‍हणावे लागेल. जिल्हाभरातून पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला होता. यामुळे बुलडाणा शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. परिस्‍थिती बिघडली तर काय करायचे याचेही नियोजन तयार होते, असे दिसून आले. दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते बुलडाण्यात दाखल झाले तेव्‍हाही वातावरणातील तणाव वाढला होता. मात्र आदल्या दिवशीच विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मीना बुलडाण्यात दाखल झाल्याने पोलीस अधीक्षकांवरील ताण काहीसा हलका झाल्याचे दिसून आले. श्री. मीना आणि श्री. चावरिया यांनी अगदी जादूची कांडी फिरवावी तसा हा वाद मिटवला. दोन्‍ही नेत्‍यांनी शांत होत, यापुढे कोरोनाशी लढण्याचा निर्णय घेतला. आपापल्या कार्यकर्त्यांनाही हा विषय इथेच संपविण्याचे आवाहन केले. या दिवशी दंगाकाबू पथक, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, अतिरिक्त पोलीस दल शहरात दाखल झाले होते.

संभाव्‍य धोक्‍याचा अचूक अंदाज…

जळगाव जामोदच्‍या आमदारांना समजूत घातल्यानंतर, कारवाईचे आश्वासन दिल्यावर ते शांत होऊन परतू लागले तेव्‍हा त्‍यांच्‍यासोबत पोलीस अधीक्षकांनी मोठा फौजफाटा देऊ केला. स्‍वतः अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांना त्‍यांच्‍यासोबत पाठविण्याची तयारी केली. मात्र आमदारांनी पोलीस संरक्षणाची गरज नसल्याचे त्‍यांना सांगितले. तरीही समजूत घालून पोलीस अधीक्षकांनी फौजफाटा सोबत पाठवला. त्‍याचवेळी मोताळा येथे पोहोचताच आमदारांवर पुन्‍हा हल्ल्याचा प्रयत्‍न झाला. त्‍यामुळे पोलीस अधीक्षकांच्‍या अचूक अंदाजाची अनुभूतीही सर्वांना झाली असेच म्‍हणावे लागेल. त्‍या दिवशी पोलीस संरक्षणाचे कडे नसते तर कदाचित पुन्‍हा काहीतरी चुकीचे झाले असते.

कायदा सर्वांना समान…

कायदा सर्वांना समान असतो, याचेही दर्शन यानिमित्ताने घडले. 18 एप्रिलच्या रात्रीच आमदारपूत्र कुणाल गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासहीत दोन्ही गटांतील दोन डझन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. तीन दिवसांत जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी तहान भूक विसरून कर्तव्यावर हजर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक  बजरंग बनसोडे (बुलडाणा),  अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, शहरचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्‍यासह पोलिसांचा गोपनीय विभाग, दंगाकाबू पथक व शीघ्र कृती दलाचे जवान परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवून होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: