क्राईम डायरीमुख्य बातम्या

Buldana Live Exclusive : सहा महिन्यांत १४ “माया’ळू अडकले जाळ्यात!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हव्याशी, माया जमविण्याच्या नादात चुकीचा मार्ग पत्‍करणाऱ्या १४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पापाचे भांडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) कर्तव्यदक्षपणामुळे फुटले! गेल्या सहा महिन्यांत अनैतिक मार्गाने “माया’ जमविण्याचा प्रयत्‍न करणाऱ्यांसाठी “एसीबी’ ने १२ जाळे फेकले. त्यात तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि महसूल प्रशासनातील चौघांसह १४ जण अडकले. लाच मागण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही “एसीबी’ने सोडले नाही. त्‍यामुळे जिल्ह्यातील लाचखोरांवर मोठा वचक बसला आहे. तरीही काही निर्लज्जम्‌ मात्र आपला हेका सोडायला तयार नाहीत. अशांची तक्रार नागरिकांनी “एसीबी’कडे बिनदिक्कत करण्याची गरज आहे.

बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) उपअधीक्षक संजय चौधरी यांच्याशी बुलडाणा लाइव्हने संवाद साधून गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कारवायांची माहिती घेतली. एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लोकांनी तक्रार करायला हवी. मात्र लोक स्वतःच्या फायद्यासाठी बिनधास्त लाच देतात आणि काम करून घेतात. लोक तक्रार न देता लाच देतात, याबद्दल श्री. चौधरी यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. लाच मागणे हा गुन्हा आहेच; मात्र एखाद्या अधिकाऱ्याला अडकविण्यासाठी मुद्दामहून लाच देण्याचा कुणी प्रयत्न करीत असल्यास अधिकाऱ्यांनीही त्याची “एसीबी’कडे तक्रार करावी, असे आवाहनही श्री चौधरी यांनी केले.

अशी आहे टीम “एसीबी’
बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तीन अधिकाऱ्यांसह 14 कर्मचारी काम करतात.

सहा महिन्यांत पकडलेले अति”माया’ळू…

 • राजेंद्र हरिभाऊ देशमुख, एएसआय जलंब पोलीस स्टेशन ः १५ हजार रुपयांची मागितली होती लाच.
 • नीलेश शरद जाधव, तलाठी, तहसील कार्यालय लोणार ः तीनशे रुपयांची लाच.
 • पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड, शाखा अभियंता, पं. स. शेगाव ः ७ हजार रुपयांची लाच.
 • दीक शंकरराव गोरे, अव्वल कारकून, उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा ः ५० हजार रुपयांची लाच.
 • योगेश उदयसिंह मोकन, सहायक अभियंता महावितरण देऊळगाव राजा ः दीड हजार रुपयांची लाच.
 • संदीप सुरेश उबाळे, कनिष्ठ अभियंता पं. स. सिंदखेड राजा ः ४० हजार रुपयांची लाच.
 • स्वप्निल जगदेवराव रणखांब, पीएसआय चिखली पोलीस स्टेशन ः १० हजार रुपयांची लाच.
 • विलास साहेबराव खेडेकर, मंडळ अधिकारी, खामगाव आणि बाबुराव उकिरडा मोरे ः तलाठी- दारू व मटणाच्या पार्टीची लाच.
 • शिवाजी कुंडलिक मोरे, पोहेकाँ बुलडाणा शहर पोलीस स्टेशन ः तीन हजार रुपयांची लाच.
 • गजानन नारायण मांटे, तलाठी, तहसील कार्यालय खामगाव ः पाचशे रुपयांची लाच.
 • कृष्णा लक्ष्मण जुंबडे, वनरक्षक, जळगाव जामोद ः अडीच हजार रुपयांची लाच.
 • संदीप सोपान साळवे, कृषी अधिकारी मोताळा आणि खासगी व्यक्ती कौतिकराव माणिकराव जुनारे, मोताळा ः तीन हजार रुपयांची लाच.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: