Buldana Live Exclusive : ज्‍युली लई भारी…! तिची कामगिरी थक्‍क करी… बुलडाण्याच्‍या पोलीस दलात झाली ‘लाडाची’!

बुलडाणा (मनोज सांगळे/अजय राजगुरे ः मो. 9822988820) ः कुत्रा हा प्राणी तसा प्रामाणिक अन् हुश्शारच असतो. तो मालकाला ओळखतो, अनोळखी व्यक्तीवर भुंकतो… वेळप्रसंगी मालकाच्या रक्षणासाठी जिवाची बाजीही लावतो… त्यातल्या त्यात पोलिसांकडील श्वान तर खूपच हुश्शार! त्यांना प्रशिक्षणच असे दिलेले असते, की मोठ्यात मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अगदी सहज शोधून काढतात. बुलडाणा पोलीस दलात ज्युली नावाची अशी …
 

बुलडाणा (मनोज सांगळे/अजय राजगुरे ः मो. 9822988820)  ः कुत्रा हा प्राणी तसा प्रामाणिक अन्‌ हुश्शारच असतो. तो मालकाला ओळखतो, अनोळखी व्‍यक्‍तीवर भुंकतो… वेळप्रसंगी मालकाच्‍या रक्षणासाठी जिवाची बाजीही लावतो… त्‍यातल्‍या त्‍यात पोलिसांकडील श्वान तर खूपच हुश्शार! त्‍यांना प्रशिक्षणच असे दिलेले असते, की मोठ्यात मोठ्या गुन्‍ह्यातील आरोपींना अगदी सहज शोधून काढतात. बुलडाणा पोलीस दलात ज्‍युली नावाची अशी एक लई हुश्शार श्वान आहे. तिच्‍यामुळेच आजवर 3 खुनाचे अन्‌ एका दरोड्याच्‍या गुन्ह्यातील आरोपी सहज समोर आले. तिच्‍याशिवाय बुलडाण्याच्‍या पोलीस दलात राणी, एंजल, राजा हेही ‘जाँबाज’ श्वान आहेत. त्‍यांच्‍याकडे कामाची ‘वेगळी’ जबाबदारी आहे!

चालू वर्षात ज्‍युलीने दोन खुनांतील आरोपींना पकडून दिले आहे. किनगाव जट्टू (ता. लोणार) येथे 25 वर्षीय सौ. निता वामन आढे हिचा गळफास देऊन तिच्‍या पतीनेच खून केला होता. तिची आत्‍महत्‍या भासवून आपण नामानिराळे राहू या भ्रमात वामन आढे होता. पण ज्‍युलीने त्‍याचा भंडाफोड केला. 26 मार्च 2021 ला सकाळी ही घटना समोर आली होती. गुन्‍हा दाखल होताच याच दिवशी दुपारी तातडीने ज्‍युलीला घटनास्‍थळाकडे रवाना करण्यात आले. ज्‍युली आली, तिने पाहिले (हुंगले) अन्‌ आरोपीला अगदी सहज पोलिसांच्‍या हवाली करून दिले, असेच जणू चित्र नंतर दिसले. सौ. निताच्‍या गळ्यावरील सुती दोरीचा वास ज्‍युलीला दिला असता तिने घटनास्‍थळावरून माग काढत 50 मीटर अंतरापर्यंत एका झाडाखाली जाऊन तिथे बसलेल्या वामनकडे बघून भुंकायला सुरुवात केली. नंतर पुन्‍हा 100 मीटरपर्यंत तुटलेल्या मंगळसूत्राचा वास दिला असता तिने पुन्‍हा वामनकडे येऊनच ‘इशारा’ केला अन्‌ वामन पोलिसांच्‍या जाळ्यात अडकला.

अशाच प्रकारे शेगाव येथे रेल्‍वेस्‍टेशन परिसरातील रामजान दांदळे (45, रा. नागझरी, ता. शेगाव) याच्‍याही खुनाचे रहस्‍य ज्‍युलीमुळे उलगडले अन्‌ रामजानचीच पत्‍नी रेखा (40) आणि तिचा प्रियकर संतोष साठे (45, रा. नागझरी) हे जाळ्यात अडकले. रामजानचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्‍थेत कटलेल्या स्‍थितीत रेल्‍वेरूळावर आढळला होता. हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. 18 एप्रिल 2021 ला घडलेल्या या घटनेत ज्‍युलीला घटनास्‍थळी नेण्यात  आले. तिला रामजानच्‍या हातापायाला बांधलेल्या दोरीचा वास देण्यात आला. तिने घटनास्‍थळावरून वास घेत दीड ते दोन किमी अंतरावरील रामजानचेच घर गाठले. 20 एप्रिलला संशयितांची ओळखपरेड ज्‍युलीने केली. गुन्ह्यात हाताळलेल्या नारळाच्‍या दोरीचा वास ज्‍युलीला देण्यात आला. त्‍याचवेळी ज्‍युलीने संतोष साठेवर भुंकत झेप घेतली. नंतर रेखाच्‍या अंगावर तिने झेप घेतली. रेखा आणि संतोषचे पाप ज्‍युलीने समोर आणले. या दोन ताज्‍या खुनाच्‍या घटनांसह ज्‍युलीने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल खुनाचा आणि चिखली पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्‍या गुन्‍ह्याचाही असा उलगडा केला आहे.

ज्‍युलीचं नक्‍की वय काय?

ज्‍युली 23 नोव्‍हेंबर 2017 रोजी बुलडाणा पोलीस दलात दाखल झाली. ती साडेतीन वर्षे वयाची आहे. खून, दरोडा, मोठ्या चोऱ्या अशा प्रकारचे गुन्‍हे उलगडण्यासाठी तिचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. ती डाबरमॅन जातीची असून, रॉयल कॅनीन हे अन्न तिच्‍यासाठी असते. अद्याप ती बाळंतिण झाली नाही. तिचा दिनक्रमही रोमांचक आहे. सकाळी उठल्यानंतर तिला सराव करायचा असतो. नंतर तिची मालिश केली जाते. मग जेवण अन्‌ ‘बाथरूम’ला जाऊन ती मस्‍तपैकी आराम करते..!

राणी, एंजल, राजाही ताफ्यात…

ज्‍युलीशिवाय बुलडाणा पोलीस दलात राणी, एंजल, राजा हेही श्वान आहेत. राणी 2 मार्च 2016 ला बुलडाण्यात आली. ती साडेपाच वर्षे वयाची आहे. राणीकडेही खुनी, दरोडेखोर, चोर हुडकून काढण्याची जबाबदारी असते. एंजल ही 23 नोव्‍हेंबर 2017 ला बुलडाण्यात आली असून, ती साडेतीन वर्षे वयाची आहे. तिच्‍याकडे अंमलीपदार्थ आणि ते बाळगणारे गुन्‍हेगार शोधून काढण्याची जबाबदारी आहे. याशिवाय राजा हा एकमेव ‘जेंट्‌स’ श्वानपथकात आहे. तो साडे पाच वर्षे वयाचा असून, 2 मार्च 2016 रोजी तो बुलडाणा पोलीस दलात दाखल झाला. व्‍हीआयपींचे दौरे, सण-उत्‍सवात तपासणीचे काम त्‍याच्‍याकडे असते. सर्व श्वानांकडून दोन वेळा सराव करून घेतला जातो. त्‍यांना दोन वेळा जेवण दिले जाते.

असे आणले जाते घटनास्‍थळी

श्वान बोलावण्याची गरज असलेल्या गुन्ह्याची माहिती आधी पोलीस नियंत्रण कक्षाकडे येते. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही माहिती जाते. वरिष्ठांकडून आदेश प्राप्‍त झाल्यानंतर श्वानपथक घटनास्‍थळाकडे रवाना होते.

श्वानपथकाची जबाबदारी यांच्‍याकडे…

श्वान पथकाची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक संजय वाढाई यांच्‍याकडे असून, श्वानांचे 8 हँडलर पोलीस कर्मचारी आहेत. यात पोहेकाँ गजेंद्रसिंह राजपूत, पोकाँ बबन जाधव यांच्‍याकडे राणीची जबाबदारी आहे. नापोकाँ राजेश पदमने, पोकाँ प्रवीण गवई यांच्‍याकडे ज्‍युलीची जबाबदारी आहे. पोहेकाँ सचिन काडे व पोहेकाँ नवीन सोनवणे यांच्‍याकडे राजाची जबाबदारी तर नापोकाँ रवींद्र बोर्डे व पोहेकाँ संजय चाकले यांच्‍याकडे एंजलची जबाबदारी आहे.