Buldana Live Exclusive : …तर बुलडाण्यातील हॉस्पिटल्सच ठरतील कोरोनाचे “सुपर स्‍प्रेडर’!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दोन लाटांतून कसेबसे सावरत असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे, याची भीती प्रत्येकालाच वाटत आहे. अगदी प्रशासकीय यंत्रणाही या धास्तीतून सुटलेली नाही. काही दिवसांपूर्वी सातत्याने कमी होणारी रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी सर्वच रुग्णालयांच्या …
 
Buldana Live Exclusive : …तर बुलडाण्यातील हॉस्पिटल्सच ठरतील कोरोनाचे “सुपर स्‍प्रेडर’!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दोन लाटांतून कसेबसे सावरत असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका व्‍यक्‍त केला जात आहे. त्‍यामुळे भविष्यात आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे, याची भीती प्रत्‍येकालाच वाटत आहे. अगदी प्रशासकीय यंत्रणाही या धास्‍तीतून सुटलेली नाही. काही दिवसांपूर्वी सातत्याने कमी होणारी रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्‍यामुळे खासगी आणि सरकारी सर्वच रुग्‍णालयांच्‍या तयारीकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. मात्र अनेक रुग्‍णालयेच कोरोनाला निमंत्रण देणारे ठरताहेत, असे म्‍हटले तर… आश्चर्यचकीत होण्यासारखी गोष्ट असली तरी, वास्‍तव चित्र मात्र तसेच आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालनच अनेक रुग्‍णालये करत नसल्याचे “बुलडाणा लाइव्ह’च्या पाहणीत समोर आले आहे. खासगी रुग्णालये नियम धाब्‍यावर बसवतच आहेत, पण जिल्हा सामान्य रुग्णालयसुद्धा याला अपवाद नाही. रुग्‍णालयांचीच नियमांकडे पाठ असेल तर तिसरी लाट कशाच्‍या भरवशावर रोखणार, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून केला जात असून, रुग्‍णालयांत नियमांचे पालन होण्याची सक्‍ती गरजेची असल्याचे मत व्‍यक्‍त केले जात आहे.

Buldana Live Exclusive : …तर बुलडाण्यातील हॉस्पिटल्सच ठरतील कोरोनाचे “सुपर स्‍प्रेडर’!

जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, शारीरिक दुरीच्या नियमांचे पालन करण्याचे, मास्क व सॅनिटायझरच्या वापराचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र प्रशासकीय यंत्रणेचाच भाग असलेल्या आरोग्य विभागाकडूनच आता या नियमांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात (अपवाद वगळता) व जिल्हा रुग्णालयात रुग्ण, नातेवाइक विनामास्क वावरताना दिसतात. त्यांना कुणीही हटकतही नाही. कोरोनाची सौम्य बाधा झाली असेल तर लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे आजाराच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यायचे आणि कोरोनाचा आजार सोबत घेऊन घरी जायचे, अशी भीती रुग्णांना आहे.

ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले…
खासगी हॉस्पिटल्स तसेच जिल्हा रुग्णालये पुन्हा एकदा हाऊसफुल व्हायला सुरुवात झाली. सर्दी, ताप, खोकला या आजारांचे रुग्ण दवाखान्यात भरती होत आहेत. पेशी कमी होणे, डेंग्यू आणि मलेरिया तापाचे रुग्णसुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

सुरक्षित अंतराच्‍या नियमाचा फज्जा
जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग याठिकाणी चिठ्ठी काढण्यासाठी रांग लागते. मात्र यात जो तो पुढे जाण्याची धडपड करतो. त्यामुळे सुरक्षित अंतराच्‍या नियमाचा भंग होतो. यासोबतच जिल्हा रुग्णालयात ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण, त्यांचे नातेवाइक, रुग्णालयाचे कर्मचारीही विनामास्क वावरताना दिसतात.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती
कोरोनाची तिसरी संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी इतर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्ण व नातेवाइकांची गर्दी होत आहे. तिथे कोविडच्या नियमांचे उल्लंघनसुद्धा केले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांनी योग्य काळजी घेतली नाही तर तेच या तिसऱ्या लाटेत सुपर स्प्रेडर ठरू शकतात. बुलडाण्यात जांभरून रोड परिसरात असणारी जवळपास सर्वच खासगी हॉस्पिटल्स हाऊसफुल आहेत. मात्र कोरोनाचे गांभीर्य कुणालाच नाही.

जिल्हा रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी विभागात रोज ४०० ते ४५० रुग्ण येतात. इथे लहान मुलांपासून ज्‍येष्ठ, वृद्ध सर्वच रुग्ण येतात. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

अधिकारी म्‍हणतात…

जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये कोविड नियमांचे पालन करण्याच्या सक्तसूचना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून रुग्ण, नातेवाइकांना वारंवार मास्क लावण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कुठे निष्काळजीपणा करण्यात येत असेल तर त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.

– नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा