Buldana Live Exclusive : दीडपटीने खतांची दरवाढ… शेतकऱ्यांचा पाय खोलात!; उद्या ‘स्‍वाभिमानी’ पेटणार, राजकारणही तापले!; वाचा का अन्‌ कशी झाली दरवाढ

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती दीडपटीने वाढल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. 700 ते 900 रुपये काही ग्रेडच्या बॅगमागे वाढले आहेत. युरियानंतर सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या डीएपी खताच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे. खत दरवाढीमुळे उत्पादन खर्चही वाढणार आहे, तेही त्यातून उत्पन्न किती मिळेल, …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खरीप हंगामाच्‍या तोंडावर रासायनिक खतांच्‍या किंमती दीडपटीने वाढल्‍याने शेतकरी चिंतित झाला आहे. 700 ते 900 रुपये काही ग्रेडच्‍या बॅगमागे वाढले आहेत. युरियानंतर सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या डीएपी खताच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने संताप व्‍यक्‍त होत आहे. खत दरवाढीमुळे उत्‍पादन खर्चही वाढणार आहे, तेही त्‍यातून उत्‍पन्‍न किती मिळेल, याची कोणताही शाश्वती नसताना..!

देशात 5 राज्‍यांतील निवडणुकांमुळे खत दरवाढीबद्दल केंद्र सरकारने घुमजाव केले होते. दर वाढणार नाहीत, हे सांगितले होते. मात्र निवडणुका होताच दरवाढीची कुऱ्हाड शेतकऱ्यांवर कोसळली आहे. इफ्‍कोचे महाव्‍यवस्‍थापक डॉ. यू. एस. अवस्‍थी यांनी वास्‍तवात एप्रिल महिन्यात दरवाढीचे संकेत दिले होते. मात्र निवडणुकांमुळे दरवाढीचे परिपत्रक निघाले नव्‍हते. आता खत उत्‍पादक कंपन्‍यांनी खते बाजारात आणताना नवे दरपत्रकही जाहीर केले आहे.

किंमती का वाढल्‍या…

संयुक्‍त खतांचे दर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसला तरी उत्‍पादक कंपन्यांना अनुदान देऊन ते दरवाढ रोखू शकतात. मात्र निवडणुकांपर्यंत कंपन्यांना दाबून ठेवणाऱ्या सरकारने नंतर या विषयातून अंग काढून घेतल्याचे दिसून येते. यूरियानंतर मोठ्या प्रमाणावर DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताचा वापर केला जातो. या खतामध्ये 46 टक्‍के एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस असतं. हे खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत. तसंच फॉस्फेट आणि पोटॅशच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे मग खतांच्या दरात कंपन्यांनी वाढ केल्याचे सांगितले जात आहे.

‘स्‍वाभिमानी’ संतप्‍त, उद्या पुतळे जाळणार; दरवाढ मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

खतांच्‍या दरवाढीवर स्‍वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, राज्‍यभर उद्या 20 मे रोजी केंद्र सरकारचे प्रतिकात्‍मक पुतळे जाळले जाणार आहेत. हे आंदोलन शेतात आणि घरासमोर होणार असल्याची माहिती स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्‍यांनी दिला. केंद्र सरकारने सबसिडी न दिल्याने कंपन्यांनी खतांची दरवाढ केली आहे. 50-100 रुपये समजले जाऊ शकते, पण तब्‍बल 700 ते 800 रुपयांनी झालेली दरवाढ ही शेतकऱ्यांना मातीत घालणारी आहे. याला पूर्णपणे केंद्र सरकार कारणीभूत असून, ताबडतोब कंपन्यांना सबसिडी देऊन दरवाढ थांबवावी, अशी मागणीही श्री. तुपकर यांनी केली.

खासदार प्रतापराव जाधव यांचे पंतप्रधानांना निवेदन

शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक सन्‍मान निधी देण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे खत दरवाढीतून त्‍याच्‍या दुप्पट रक्‍कम शेतकऱ्यांकडून वसूल करायची हे दुटप्पी आणि फसवे धोरण केंद्र सरकारचे असून, ही वाढ कमी करण्याची मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे.  गेल्या वर्षी डीएपी 1200 रुपयांनी मिळत होते ते आता 1900 रुपयांनी घ्यावे लागणार आहे. अन्य खतांच्‍या किंमतीदेखील 700 ते 800 रुपयांनी वाढल्‍या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी खतदरवाढीचा बोजा त्‍यांच्‍यावर लादून काय साध्य केले असा सवाल खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

असे वाढले दर

जुना साठा, जुन्याच दराने…

देशातील सर्वाधिक मोठी खत उत्पादक कंपनीने असलेल्या इफ्कोने (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited ) पत्रक जारी करून नवे दर जाहीर केले होते आणि हे जर 1 एप्रिलपासून लागू होतील, असं म्हटलं होतं. इफ्कोकडे 11.26 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहेत आणि ते जुन्या दराप्रमाणे म्हणजेच DAP – 1200 रुपये प्रति बॅग, NPK 10:26:26 – 1175 रुपये प्रति बॅग, NPK 12:32:16 – 1185 रुपये प्रति बॅग आणि NPS 20:20:0:13 – 925 रुपये प्रति बॅग विकलं जाईल. नवीन दराची खतं ही विक्रीसाठी नाहीयेत, असं स्‍पष्टीकरण इफ्‍कोने दिलं आहे. मात्र काही व्‍यापारी जुना स्‍टॉकही नव्‍या दरात खपविण्याची शक्‍यता लक्षात घेऊन स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अशा व्‍यापाऱ्यांवर कृषी विभाग आणि प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकार म्‍हणते…

आंतरराष्ट्रीय बाजारात DAP खतासाठी लागणारा कच्चा माल आणि तसंच तयार DAP खताच्याही किमती वाढल्या आहेत. असं असतानाही गेल्या महिन्यापर्यंत खत कंपन्यांनी भारतात DAP च्या किमती वाढवल्या नव्हत्या. आता मात्र काही कंपन्यांनी किंमतीत वाढ केली आहे, असे केंद्र सरकारने म्‍हटले आहे. मात्र खते विक्रेत्यांच्या मते, जवळपास सगळ्याच खत उत्पादक कंपन्यांनी गोणीमागे 600 ते 700 रुपये वाढवले आहेत.

कृषी विभागात नेहमीप्रमाणे गोंधळ…

कृषी विभागाकडून खत दरवाढीबद्दल काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र बॅगवर प्रिंटेड दरानुसार शेतकऱ्यांनी पैसे द्यावे. कुणी जास्‍तीचे पैसे मागत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

राष्ट्रवादी तापली… पण काँग्रेस थंडच!

खतांच्‍या दरवाढीवरून जिल्ह्यातील राजकारणही तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारला घेरण्याची संधी सोडलेली नाही. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत निषेध व्‍यक्‍त केला. शिवसेनेच्‍या खासदारांनीही पंतप्रधानांना निवेदन देऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली व केंद्र सरकारवर टीकास्‍त्र सोडले. दुसरीकडे त्‍यांचा पारंपरिक काँग्रेस मात्र या विषयावर थंड दिसून येत आहे. त्‍यांना शेतकऱ्यांच्‍या या गंभीर विषयाबद्दल जाग कधी येणार, असा प्रश्न बळीराजा विचारतोय. स्‍थानिक राजकारणातून शेतकऱ्यांच्‍या या गंभीर समस्येकडे जिल्हाध्यक्षांना बघण्यास वेळ मिळाला नाही का, असा खोचक सवाल कार्यकर्ते करत आहेत.

सबसिडी कमी….

खतांची सबसिडी ज्‍या घटकांवर अवलंबून असते, त्‍या घटकांची सबसिडी केंद्र सरकारने कमी केली आहे. नत्राची सबसिडी प्रतिकिलो १८.९०१ वरून १८.७८९ रुपये, स्फुरद १५.२१६ वरून १४.८८८ रुपये, पालाश ११.१२४ वरून १०.११६ रुपये, गंधक ३.५६२ वरून २.३७४ रुपये प्रतिकिलो करण्यात आली आहे.

…म्‍हणून शेतकरी कर्जबाजारी

शेतीच्या मशागतीचे कामे सुरू असून, काही दिवसांत मृग नक्षत्र सुरू झाले की, नगदी पिकांची लागवड सुरू होते. पीक जोमाने वाढावे, यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसांत रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासून रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात वाढायला सुरुवात होते. त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किमती आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांचे डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करणार असलेले सरकार शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुप्पट करत असल्याची भावना व्‍यक्‍त होत आहे.