Buldana Live Exclusive : पिकांनी ओढली धुळीची चादर; ब्लास्टिंगची दगडं उडून सौरपंप गेला कामातून… शेतकरी रडकुंडीला!; समृद्धीचा ना ठेकेदार ऐकतोय, ना अधिकारी..!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समृद्धी महामार्गाचे काम करताना ठेकेदाराने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. कच्च्या रस्त्यावर पाणी मारण्यापासून तर ब्लास्टिंगदरम्यान घ्यावयाच्या काळजीचाही त्याला विसर पडत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. पिकांनी धुळीची चाद ओढली असून, हाती किती उत्पन्न येईल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. हे संकट घोंगावत असताना आज, …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समृद्धी महामार्गाचे काम करताना ठेकेदाराने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. कच्च्या रस्त्यावर पाणी मारण्यापासून तर ब्लास्टिंगदरम्यान घ्यावयाच्या काळजीचाही त्याला विसर पडत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. पिकांनी धुळीची चाद ओढली असून, हाती किती उत्पन्न येईल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. हे संकट घोंगावत असताना आज, 10 फेब्रुवारीला ब्लास्टिंगची दगडं थेट सौरपंपावर उडून पंपच निकामी झाला आहे. ही भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांनी बुलडाणा लाइव्हच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाकडे केली आहे.


विदर्भाचे प्रवेशव्दार, जुना नागपूर- मुंबई महामार्गावरील सावरगाव माळ (ता. सिंदखेड राजा) येथून समृद्धी महामार्ग जात आहे. हे गाव डोंगरावर वसलेले आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर डोंगर खोदाईचे काम चालू आहे. त्यामुळे रोज ब्लास्टिंग करण्यात येते. या ब्लास्टिंगमुळे सावरगाव माळ, गोळेगाव, तुळजापूर येथील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानीचा मोबदला ठेकेदार व अधिकारी कधी देणार, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.
आता पिकांना पाणी कसे द्यायचे..?
आज सकाळी झालेल्या ब्लास्टिंगमध्ये गट क्र. 45 मधील मुरलीधर ज्ञानदेव कठोरे, भरत ज्ञानदेव कठोर या दोन भावांच्या शेतामधील सौर पंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या गटामध्ये दोन विहिरी आहेत. हा भाग डोंगरावर असल्यामुळे विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे या दोन भावांनी आपल्या शेतात सौर पंप घेतला होता. परंतु ब्लास्टिंगचे दगडं उडून सौर पंपांना मोठमोठी छिद्रं पडल्यामुळे सौरपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता सौर पंप सुरू कसा करावा, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दोन्ही भावांनी आपल्या शेतात द्राक्षाची लागवडीची केली आहे. तसेच इतर भाजीपाला पिकेही ते घेतात. सौर पंप बंद पडल्यामुळे या पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.
पिकांवर साचली धूळ
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतातील फळबाग व इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. येणार्‍या व जाणार्‍या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असते. संबंधित ठेकेदार कच्च्या रस्त्यावर पाणी टाकत नसल्यामुळे धुळ उडत असते. तीच धूळ पिकांवर साचून पिके खराब होत आहेत.


बुलडाणा लाइव्ह’ला सांगितली व्यथा
शेतकरी भरत ज्ञानदेव कठोर यांनी बुलडाणा लाइव्हशी संपर्क करून व्यथा मांडली. तसेच आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीचे निवेदनही दिले.