Buldana Live Exclusive : प्रशासनावरच खापर फोडण्यापेक्षा जरा इथेही दाखवा तुमची ‘नेते’गिरी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820)ः जनता पाठिशी आहे म्हणायचे आणि तीच जनता जेव्हा संकटात आहे तेव्हा प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे व्हायचे… हीच पळवाट सध्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते म्हणवणाऱ्यांनी अवलंबल्याचे दिसून येते. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या आमदारांचे कर्तृत्व सध्या राज्यभर गाजतेय. दुसरीकडे आपल्याकडचे नेते मात्र कार्यकर्त्याने जरी कॉल केला तरी प्रशासनाच्या नावाने बोटे मोडताना दिसताहेत. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820)ः जनता पाठिशी आहे म्‍हणायचे आणि तीच जनता जेव्हा संकटात आहे तेव्‍हा प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे व्‍हायचे… हीच पळवाट सध्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते म्‍हणवणाऱ्यांनी अवलंबल्‍याचे दिसून येते. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्‍या आमदारांचे कर्तृत्‍व सध्या राज्‍यभर गाजतेय. दुसरीकडे आपल्याकडचे नेते मात्र कार्यकर्त्याने जरी कॉल केला तरी प्रशासनाच्‍या नावाने बोटे मोडताना दिसताहेत. त्‍याऐवजी पुढाकार घेऊन एखादे कोविड केअर सेंटर सुरू करण्याकडे नेते, लोकप्रतिनिधींचा कल का नाही, असा प्रश्न त्‍यांच्‍याच मतदारासंघातील नागरिक विचारत नसतील तर नवल! स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी स्‍वतंत्रपणे आणि खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांनी संयुक्‍तपणे कोविड उपचार केंद्र सुरू केले. दुसरीकडे बाकीच्‍या नेत्‍यांचा मात्र दुसऱ्या लाटेच्‍या तीव्रतेमुळे आधी हतबल झालेल्या प्रशासनावर खापर फोडण्याचा सिलसिला सुरूच आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. रुग्‍णांची संख्या मोठी असल्याने त्‍या तुलनेत यंत्रणा कमी पडतेय. मनुष्यबळापासून उपचार साहित्‍यापर्यंतची टंचाई गेल्या काही दिवसांत जाणवल्याचे दिसून येतेय. एप्रिल आणि मेच्‍या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तर ऑक्सिजन बेड उपलब्‍ध होणेच कठीण जात होते. एखादा रुग्‍ण बरा झाल्‍याशिवाय तो बेड उपलब्‍ध व्‍हायचा नाही. अशावेळी शक्‍य होईल तसे उपचार आरोग्‍य यंत्रणेने केले. एखादा कार्यकर्ता किंवा त्‍याचे नातेवाइक रुग्‍णालयात दाखल झाले की नेत्‍याला कॉल गेलाच म्‍हणून समजा. मग नेता बेडची व्यवस्‍था करण्याचे आदेश द्यायचा. पण यंत्रणेकडे बेडच उपलब्‍ध नसेल तर कुठून व्‍यवस्‍था करणार? पण आपणच एखादे कोविड सेंटर सुरू करून आपल्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची सोय करू, असा विचार बोटावर मोजण्याइतक्‍या नेत्‍यांनी केला. सर्वांत आधी हा विचार अंमलात आणला तो स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी. त्‍यांनी गावकऱ्यांना एकत्र करत किन्होळा पॅटर्न राबवला. या पॅटर्नचे कौतुक अगदी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनीही केले. गावात कोविड केअर सेंटर सुरू झाल्‍याने पंचक्रोशीतील रुग्‍णांवर वेळेत उपचार सुरू झाले. त्‍यानंतर आमदार श्वेताताई महाले यांनी कोविड सेंटर करण्याच्‍या हालचाली सुरू केल्या. 50 बेडचे कोविड रुग्‍णालय त्‍यांनी सुरू केले. ताईंनी कोरोना सेंटर सुरू केले म्‍हटल्‍यावर भाऊ मागे कसे राहणार… माजी आमदार राहुल बोंद्रे यांनीही 100 बेडचे कोविड रुग्‍णालय सुरू केले. याशिवाय मेहकरमध्येही खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमूलकर यांनी 100 बेडचे उपचार केंद्र सुरू केले. गेल्याच आठवड्यात योगेंद्र गोडे यांनीही मोताळ्यात उपचार केंद्र सुरू केले. अशाच पद्धतीने सर्वच नेत्‍यांनी आपापल्या परिसरात लोकसहभागातून का होईना उपचार केंद्र सुरू केले तर आरोग्‍य यंत्रणेवरचा ताण कमी होईलच, पण खासगी रुग्‍णालयांचीही मनमानी कमी होईल, अशी भावना व्‍यक्‍त होत आहे.

लंकेंचा राज्‍यभर डंका

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सर्वप्रथम अशाप्रकारे कोविड केअर सेंटर सुरू केले. तब्‍बल 1100 बेडचे हे केंद्र आहे. या ठिकाणी 24 तास आमदार लंके हजर असतात. रात्रीचा मुक्काम, जेवण सर्व तिथल्या रुग्णांसोबतच होते. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे उदाहरणच त्‍यांनी या उपचार केंद्राच्‍या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले. सध्या श्री. लंके तिथल्‍या जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. प्रशासनाला दोष देणे, अधिकाऱ्यांना खडसावणे यापेक्षा स्वतः मैदानात उतरून त्यांनी उपाय शोधला आणि कामाला लागले. हा आदर्श जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्‍या लोकप्रतिनिधींनीच घेण्यासारखा आहे का?

जिल्ह्यात नेत्‍यांची काय कमी..?

जिल्ह्यात तशी नेत्यांची कमतरता नाहीच. सात आमदार, डझनभर सक्रीय माजी आमदार आणि तेवढेच स्वतःला भावी आमदार म्हणवून घेणारे सुद्धा आहेत. वेळोवेळी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन वृत्तपत्रात बातमी छापून आणणारे नेतेही भरपूर. मात्र त्‍यांना एखादे कोविड केअर सेंटर सुरू करावेसे का वाटले नाही, असा प्रश्न आता त्‍यांच्‍याच समर्थक, कार्यकर्त्यांनी त्‍यांना विचारण्याची गरज आहे.