Buldana Live Exclusive : वाढत्‍या कोरोनामुळे आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर! महिला रुग्णालयात 7 अतिरिक्त बेडची सुविधा, आयटीआय, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्रत्येकी 100 बेड्सचे नियोजन

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दमदार व धोकादायक कमबॅकमुळे निर्माण होणारी संभाव्य अडचण लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे! बेड्सचा संभाव्य तुटवडा गृहीत धरून आतापासूनच विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा मुख्यालयातील बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्‍या दमदार व धोकादायक कमबॅकमुळे निर्माण होणारी संभाव्य अडचण लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे! बेड्सचा संभाव्य तुटवडा गृहीत धरून आतापासूनच विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा मुख्यालयातील बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता दररोज आपण,  जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासमवेत सकाळी आढावा वजा चर्चा करतो. त्यांच्या मार्गदर्शनात वाढीव बेड्‌सचे नियोजन करण्यात आले. यानुसार क्षय आरोग्य धाम परिसरात 7 बेड्सची अतिरिक्त सुविधा करण्यात येत आहे. याशिवाय मलकापूर मार्गावरील शासकीय आयटीआयमध्ये 100 तर जिल्हा कारागृह परिसरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात 100 बेड्सच्या डीसीएचसी ( डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर) चे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामसेवकमधील केंद्र  सज्ज असून, आयटीआय मधील केंद्र प्रस्तावित असल्याचे डॉ. तडस यांनी स्पष्ट केले. भविष्यात बेड्‌सचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

4068 बेड्स

दरम्यान या चर्चेत सीएस डॉ. तडस यांनी विविध संलग्न बाबींचा देखील उहापोह केला. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आवश्यकतेनुसार गोळ्या औषधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून 4064 बेड्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये 318 आयसीयू, ऑक्सिजन सुविधायुक्त 610, व्हेंटिलेटरयुक्त 116 आणि ऑक्सिजन सुविधा नसलेल्या 3146 बेड्सचा समावेश असल्याचे डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.