बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live Exclusive…. 309 गावांतील 7 हजार हेक्टरवरील पिकांना जबर तडाखा! 9837 शेतकऱ्यांना फटका!! पिकांसह फळबागा, कांद्याची जबर नासाडी

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निसर्गाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्ती, वरुणराजा व त्याच्या सहकाऱ्यांचे तांडव काय राहते याचा प्रलयंकारी अनुभव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसह 25 लाखांवर जिल्हावासीयांना आला! सलग 2 दिवसांच्या काही तासांत निसर्गाच्या रुद्रावताराने हजारो हेक्टरवरील हिरवीगार पिके, फळबागाच नव्हे शेतकऱ्यांची हिरवी स्वप्ने उद्‍ध्वस्त झालीत!! काही तासांच्या या तांडवात 309 गावांतील सुमारे 7 हजार  हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे साडेआठ हजारांवर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, आता त्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहे.

हवामान खात्याचा अंदाज कधी नव्हे तो खरा ठरवत सोसाट्याचे वारे, गारपीट यासह 19 व 20 मार्चला जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. 19 मार्चला जिल्ह्यातील 100 गावांतील 2811 हेक्टरवरील गहू, शाळू, मका, कांदे, भाजीपाला, फळबागाचे नुकसान झाले याचा 4433 शेतकऱ्यांना जबर फटका बसला. यापाठोपाठ 20 तारखेला बरसलेल्या पावसाचा, वादळी वाऱ्याचा व गारपिटीचा आवेग कितीतरी  जास्त  होता. त्याने एका फटक्यात 8 तालुक्यांतील 109 गावांतील 4111 हेक्टर 80 आर शेतीवरील पिकांना जमीनदोस्त केले. यामुळे 5404 कास्तकारांचे अवसान गळाले! खामगाव तालुक्यातील 48 गावांतील 2890 हेक्टर जमीन व 3300 शेतकऱ्यांना त्याने एकाच वेळी नेस्तनाबूत केले. अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे, प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे झाल्यावर हा आकडा जास्त येणार हे उघड आहे.

तातडीने पंचनामे सुरू करण्याची गरज

सूचना करण्याची सोपस्‍कार लोकप्रतिनिधींनी पार पाडले असले तरी प्रत्‍यक्षात तातडीने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्‍ताव पाठविण्याची गरज आहे. मात्र आजवरचा अनुभव पाहता हे अर्थातच तातडीने होईल याची शाश्वती नाही. मागील गारपिटीचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. मदत तर दूरचीच गोष्ट आहे. अनेक शेतकऱ्यांच्‍या शेतात तेव्‍हा अधिकारी, कर्मचारी पोहोचले होते तेव्‍हा दुसरे पीक घेण्यासाठी शेती तयार करत होते. अशा परिस्‍थितीत पंचनामा कशाचा करणार, असा संतप्‍त सवाल शेतकऱ्यांनी केला होता. यावेळी तरी तसे होऊ नये. कारण अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके वाया गेल्यानंतर उन्‍हाळी पिकांच्‍या भरवशावरच त्‍यांनी खरीप हंगामाचे नियोजन केले होते. आता तीही पिके हातची गेल्याने त्‍यांच्‍या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने दिरंगाई न करता तातडीने मदत करण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय स्‍तरावर आणि शासनस्‍तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्‍यक्‍त होत आहे.

नुकसान झालेले तालुके

बुलडाणा, मोताळा, खामगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, नांदुरा या तालुक्‍यांत शेतीचे मोठे नुकसान गारपीट आणि पावसाने गेल्या 2 दिवसांत केले. फळपिके, गहू, हरभरा, मका, कांदा बिजोत्‍पादन, काही ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. अनेकांचे शेडनेट कामातून गेले असून, त्‍यांनाही शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: