जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live political exclusive : वासनिकांचे आता किती दिवस ऐकायचे? बंडाचा ‘श्रीगणेशा’!; ‘त्‍या’ गुप्‍त बैठकीमुळे ‘बॉसची’ २१ जूनची अर्जंट जिल्हा भेट!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पहिलाच दौरा अनेक कारणांमुळे गाजला, वादळी ठरला, यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसचे “दादा’ नेते मुकुल वासनिक यांचा तातडीचा दौरा लागल्याने जिल्हावासीयांच्याच नव्हे तर अख्ख्या काँग्रेसजनांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अर्जंट भेटीमागचे कारण काय याबद्दल काँग्रेसवर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतानाच बुलडाणा लाइव्‍हने यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्‍न केला असता, काँग्रेसमध्ये दस्तुरखुद्द वासनिक द ग्रेट यांच्या विरोधात उभारण्यात येणारे बंड आणि जिल्हाध्यक्ष बदलावरून उठलेले वादळ, उफाळून आलेली गटबाजी या मुख्य कारणांवरून हा दौरा ठरल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. परिणामी 21 जूनचा हा एकदिवसीय दौरा आतापासूनच लक्षवेधी ठरलाय!

आक्रमक अन्‌ अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले यांचा नुकताच झालेला दौरा चांगलाच गाजला. या धावत्या दौऱ्यात पक्षातील गटबाजी, नेत्यांचे शक्तीप्रदर्शन, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, विस्कळीत संघटन चव्हाट्यावर आले. सन 1990 पासून मुकुल वासनिकांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसची वाटचाल राहिली. अगदी ब्लॉक अध्यक्ष ते आमदारकीची उमेदवारी या सर्व निर्णयांत वासनिकांचा ग्रीन सिग्नल निर्णायक ठरत आला. मात्र बुलडाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यापासून हे चित्र बदलले. वासनिकांचे बोट धरून व त्यांच्या आशीर्वादाने मोठे झालेले नेते नंतर स्वतःला मोठे समजू लागले. काही तर त्यांच्यावरच उलटले, राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्यामुळे वासनिकांना जिल्ह्यासाठी वेळ द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे व वासनिकनिष्ठ म्हणवून घेणाऱ्या जिल्ह्यातील काही प्रस्‍थापित नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्याने त्यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या.

बंडाचा “श्रीगणेशा’
वासनिकांचे आता किती दिवस ऐकायचे? आपले काही स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही?? आपण किती दिवस दबून राहायचे??? असे विविध प्रश्न घेऊन काही नेते एकत्र आलेत. अलीकडे त्यांच्या गटाने उचल खाल्ली, नानांच्या दौऱ्याच्या आसपास या बंडखोर गटाची गुप्त बैठक बुलडाण्यातील गजानन महाराज मंदिर परिसरातील सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या एका नेत्याच्या बंगल्यात पार पडल्याचे समजते. यात वासनिक विरोधी सूर आळविण्यात आला. वासनिकांचे कुठपर्यंत ऐकायचे यावर यावेळी चिंतन मनन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वासनिक विरोधी नेते हजर असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. या गटाच्या आणखी बैठका झाल्याने वासनिकविरोधी बंडाचा “श्रीगणेशा’ झाल्याचे समजले जात आहे. वासनिकांचे प्रभुत्व कमी करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे जिल्हाध्यक्ष आपलाच हवा असा संकल्प या गटाने केल्याची खबर आहे. यामुळे मोठ्या पदावर असलेले नेतेही अचानक इच्छुक झाल्याचे चित्र आहे. यामुळे सावध झालेल्या वासनिक निष्ठावान गटाने याचा रिपोर्ट “बॉस’ पर्यंत पोहोचवल्याचे वृत्त आहे. वासनिकांचा अचानक दौरा ठरण्यामागे ही 2 प्रमुख कारणे आहेत.

असा आहे दौरा…
दुपारी 12ः30 वाजता जळगाव जामोद
1ः45 वा. मूर्ती( ता, मोताळा)
3ः45 वा. सिंदखेड राजा
4ः 45 वा. साखरखेर्डा
5ः15 वा. नागपूरकडे रवाना

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: