Buldana Live Political special : जुलैअखेर ठरणार काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष! नानांच्या दिल्ली दौऱ्यानंतर नावावर शिक्कामोर्तब!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखेर काँग्रेसचा नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आलीय! उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची दाट शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे लघु अधिवेशन आटोपले असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बहुप्रतिक्षित दिल्ली दौऱ्यात जिल्हा काँग्रेसच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब होईल. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या आसपास होणार आहे. त्यापाठोपाठ …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अखेर काँग्रेसचा नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आलीय! उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची दाट शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे लघु अधिवेशन आटोपले असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बहुप्रतिक्षित दिल्ली दौऱ्यात जिल्हा काँग्रेसच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब होईल.

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या आसपास होणार आहे. त्यापाठोपाठ पुढील वर्षीच्या प्रारंभी जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांचा रणसंग्राम रंगणार आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा फैसला तातडीने करणे क्रमप्राप्त व अपरिहार्य ठरले आहे. यामुळे अजूनही काँग्रेस पक्षातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही मानाचे पद समजले जाणाऱ्या या पदाच्या नियुक्तीसाठी काँग्रेस वर्तुळात लगीनघाई चालली आहे. अध्यक्षपदासाठी “एक अनार दस बिमार’ अशी मजेदार स्थिती आहे. विद्यमान अध्यक्ष राहुल बोंद्रे रिपीट होण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर तीन वर्षे झालेल्यांना बदलायचेच, असा निर्णय झाल्याने त्यांना डच्चू मिळणे क्रमप्राप्त ठरले आहे. ॲड. विजय सावळे, जि.प. सदस्या जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ही नावे अंतिम निवडीसाठी पॅनलमध्ये असल्याची माहिती आहे. याशिवाय संतोष आंबेकर, दीपक रिंढे, प्रकाश पाटील, कासम गवळी, चित्रांगद खंडारे हेदेखील इच्छुक व प्रयत्नशील आहेत. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदाधिकारी देखील शर्यतीत उतरल्याने पदासाठीची व गटातटातील चुरस, राजकारण, किती तीव्र आहे हे स्पष्ट होते. त्यातच मुकुल वासनिक विरोधी गटाने नेमके याचवेळी हालचाली सुरू केल्याने निवडीतील गुंतागुंत वाढली आहे.

भावी निवडणुका तोंडावर आल्याने पक्ष श्रेष्ठींना जुलै अखेरपर्यंत निर्णय घेणे अटळ आहे. नवीन अध्यक्षांना अभ्यास, दौरे, संपर्क, नवीन नियुक्त्या व भावी लढतीचे नियोजन करण्यासाठी कालावधी मिळणे आवश्यक आहे. यामुळे स्वबळाची भाषा बोलणारे नाना पटोले लवकरच दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठी आणि जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांच्या संमतीने अध्यक्षपदाचा फैसला करतील. ज्यांना मोठे केले त्यातील काही जण बंडाची भाषा करायला लागल्याने व गुप्त बैठका घेण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने वासनिकांनाही निवड करताना यंदा थोडी जास्तच डोकेदुखी राहणार आहे. मेहनतीने उभी केलेली जिल्हा काँग्रेस धूर्त राजकारणी समजले जाणारे व कोटिल्यनीती कोळून प्यालेले वासनिक हितशत्रुच्या हाती जाऊ देतील असे शक्यच नाही!