Buldana Live Political Special : वाढत्या आव्हानांमुळे मुकुल वासनिकांची वाढली डोकेदुखी! जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता बनला राजकीय धर्मसंकट!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकवणाऱ्या जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कारवाया वाढल्या आहे. या अतिमहत्वाकांक्षी गटाच्या वाढत्या कारवाया अन् जिल्हाध्यक्ष निवडण्यावरून धूर्त राजकारणी समजल्या जाणाऱ्या मुकुल वासनिकांसमोर बऱ्यापैकी राजकीय आव्हान उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता वाढल्याने दस्तुरखुद्द …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकवणाऱ्या जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कारवाया वाढल्या आहे. या अतिमहत्वाकांक्षी गटाच्या वाढत्या कारवाया अन्‌ जिल्हाध्यक्ष निवडण्यावरून धूर्त राजकारणी समजल्या जाणाऱ्या मुकुल वासनिकांसमोर बऱ्यापैकी राजकीय आव्हान उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता वाढल्याने दस्तुरखुद्द वासनिकांसमक्ष राजकीय धर्मसंकट वाढल्याचे चित्र आहे. यामुळे वासनिक निष्ठावंत गटाला अंतर्गत बंडखोरांना रोखण्यासाठी दमदार अध्यक्षासह आपल्या गटात खमक्या नेत्यांची कुमक वाढविणेदेखील गरजेचे झाल्याचे मानले जात आहे.

ज्यांना बोट धरून राजकारणात मोठे केले वा राजकारणापासून संघटनात्मक मोठी पदे देऊन मोठे केले असे काही नेते आता आपल्यावर उलटले आहेत, याची वासनिकांना चांगलीच जाणीव झाली आहे. यावर कळस आणि एकीकडे निष्ठावान म्हणवून घेणारे नेते या वासनिकविरोधी गटाला रोखण्यातच काय त्यांच्या विरोधात साधा आवाज उठवायला देखील तयार नाहीत. किंबहुना त्यांच्यात तो दमच नाही, हे वासनिकच काय साध्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना देखील कळून चुकले आहे. त्यामुळे आता नव्वदीच्या दशकापासून रक्ताचे पाणी करून वाढविलेली जिल्हा काँग्रेस वाचविण्यासाठी किंबहुना त्यावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी आणि विरोधी गटाला रोखण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे वासनिकांच्या पुरेपूर लक्षात आले आहे. साम, दाम, दंड, भेद ही तत्वे कोळून प्यालेले आणि काँगेस हिताशिवाय कोणताच विचार मनात न आणणारे वासनिक अध्यक्ष निवडीवरून कमालीचे सावध झाल्याचे दिसून येते. यामुळे वेळप्रसंगी “फ्रेश’ परंतु निष्ठा व कार्यक्षमता या दोन कसोट्यांवर उतरणाऱ्या नेत्याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बनविण्याची त्यांची मानसिकता झाल्याचे समजते. याशिवाय पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे नियोजन करून ते आव्हान पेलणे आणि बंडखोरीचा “श्री गणेश’ करणाऱ्या नेत्यांना पायबंद घालण्याची क्षमता असणे हे छुपे निकष देखील असावेत, असा वासनिकांचा रागरंग वाटतोय! यामुळे विरोधी गटांनी कार्याध्यक्ष, अमरावती, दिल्ली असे कसेही कनेक्शन जुळवून जिल्हा काँग्रेस आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले असले तरी धक्कातंत्रात वाक्‌बदार वासनिक ते उधळून लावणार हे उघड आहे. दुसरीकडे नियोजनपूर्वक आपली ताकद वाढविणाऱ्या विरोधी गटाला चांगलेच ओळखून असणाऱ्या आणि आपल्या रफटफ राजकीय स्टाईलने व दमदाटीने सरळ करण्यात वाक्‌बदार असलेल्या नेत्याला पक्षात आणण्याचे प्रयत्न वासनिक समर्थक नेत्याने चालविले आहे. आजवर त्याची फारशी दखल न घेणाऱ्या वासनिकांनी आता मात्र हा रामबाण उपाय गंभीरतेने घेतलाय! विरोधी गटाला चाप लावतानाच चिखली विधानसभेत सक्षम पर्याय उभा करणे हा देखील यामागील छुपा हेतू असू शकतो. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅप्टनच्या संभाव्य प्रवेशावरून जाहीरपणे झालेला अपमान मुकुल वासनिकांसारखा स्वाभिमानी व पक्षनिष्ठ नेता विसरणे “नामुमकीन’ आहे. यामुळे नवाकोरा जिल्हाध्यक्ष अन्‌ काही खमक्यांचे प्रवेश या दोन रामबाण अस्त्राद्वारे बंडोबाचे बंड थंड करण्याची चाल ते खेळू शकतात, नजीकच्या काळात या मास्टरमाईंड चाली प्रत्यक्ष कृतीत दिसू शकतात.