Buldana Live Special… असा अडकला पीएसआय रणखांब! हॉटेलमालकाने तोंडावरचा मास्क काढला अन्‌ ‘एसीबी’च्‍या अधिकाऱ्यांनी घातली झडप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तो हॉटेलवर आला… ‘एसीबी’च्या पथकातील अधिकारी हॉटेलच्या बाहेर आडोशाला थांबले होते… पण संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून… गेटसमोरच त्याने 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली अन् खाकी वर्दीच्या पँटच्या खिशात टाकली. त्याचवेळी हॉटेलमालकाने तोंडावरील मास्क काढत इशारा केला अन् ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली… चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील जगदेवराव रणखांब …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तो हॉटेलवर आला… ‘एसीबी’च्‍या पथकातील अधिकारी हॉटेलच्या बाहेर आडोशाला थांबले होते… पण संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून… गेटसमोरच त्‍याने 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली अन्‌ खाकी वर्दीच्या पँटच्या खिशात टाकली. त्‍याचवेळी हॉटेलमालकाने तोंडावरील मास्क काढत इशारा केला अन्‌ ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी त्‍याच्‍यावर झडप घातली… चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील जगदेवराव रणखांब याला लाच घेताना पकडल्‍याचा हा घटनाक्रम..!

काल, 1 एप्रिल रोजी सायंकाळी रणखांब याला बुलडाण्याच्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी रात्री उशिरा तो कार्यरत असलेल्या चिखली पोलीस ठाण्यातच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढावली. जुगाराच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी त्याने हॉटेल अमृततुल्यच्या मालकाला लाच मागितली होती.  सापळा यशस्वी झाल्‍यानंतर हॉटेल मालकाने चिखली पोलीस ठाण्यात त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार नोंदवली.

नक्‍की काय घडले…?

23 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी हॉटेल अमृततुल्यवर छापा मारून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत हॉटेल मॅनेजरसह 8 जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस ठाण्यातील पीएसआय रणखांब याच्याकडे देण्यात आला होता. 24 मार्च रोजी रणखांबने हॉटेल अमृततुल्यवर येऊन हॉटेल मालकाला चिखली पोलीस ठाण्यात हजर व्हायला सांगितले. त्यानुसार 25 मार्च रोजी हॉटेलमालक व मॅनेजर असे दोघे जण पोलीस ठाण्यात येऊन पीएसआय रणखांबला भेटले. त्यावेळी हॉटेल मालक या नात्याने तुम्हाला जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी करून अटक करावे लागेल. जर तुमचे नाव जुगाराच्या गुन्ह्यातून वगळायचे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे रणखांब हॉटेल मालकाला म्हणाला.

31 मार्च रोजीच अडकणार होता जाळ्यात, पण…

हॉटेलमालकाला लाच द्यायची नसल्याने त्यांनी 31 मार्च रोजी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय चौधरी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्याच दिवशी ‘एसीबी’चे पथक आगार व्यवस्थापक कार्यालयातील दोन शासकीय पंचांना घेऊन सवणा रोडवरील आशीर्वाद मंगल कार्यालय परिसरात दाखल झाले होते. तिथेच हॉटेल मालकाने रणखांब लाच मागत असल्याची लेखी तक्रार ‘एसीबी’कडे दिली होती. त्यानंतर हॉटेलमालकासोबत एका शासकीय पंचाला चिखली पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी पाठवण्यात आले. मात्र  31 मार्चला रणखांबची साप्ताहिक सुटी असल्याने त्याला फोन लावला असता उद्या तुम्हाला हॉटेलवर भेटायला येतो, असे रणखांब म्हणाला. ही बाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर पुन्हा 1 एप्रिल रोजी पडताळणी करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

…अन्‌ जाळ्यात अडकला!

काल, 1 एप्रिलला पुन्हा एसीबीचे पथक शासकीय पंचांना घेऊन चिखली येथे तक्रारदाराच्या हॉटेल अमृततुल्य येथे दाखल झाले. लाचेच्या  मागणीची पडताळणी करण्यासाठी हॉटेलमालकांकडे व्हॉइस रेकॉर्डर देण्यात येऊन एका शासकीय पंचासोबत त्यांना चिखली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. यावेळी हॉटेल मालकाने रणखांबशी संवाद साधताना ‘घ्यायचं असतं क्लोज करून…’ असे म्हटल्यावर रणखांब म्हणाला की, ‘मी त्यादिवशीच क्लोज करणार होतो.’ त्यावेळी हॉटेल मालक म्हणाले, की साहेबांचं काही म्हणणं आहे की… “त्यावेळी “सरचं म्हणणं म्हणजे तुम्ही समजून घ्या” असे रणखांब म्हणाला. तेव्हा हॉटेलमालक म्हणाले की काय असलं तर बोला अन्‌ मोकळं करून टाका… त्यावेळी रणखांब म्हणाला, की मी साहेबांना बोलतो अन्‌ तुम्हाला अर्ध्या घंट्यात सांगतो. तेव्हा हॉटेलमालक व शासकीय पंच दोघेही हॉटेलमध्ये परत आले. थोड्याच वेळात रणखांबने हॉटेल मालकाला फोन करून तो 10 मिनिटांत हॉटेलवर येणार असल्याचे कळवले. तेव्हा हॉटेल अमृततुल्य येथेच लाच पडताळणी कारवाई करण्याचे पथकाने ठरवले. त्यानुसार रणखांब हा एका पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेऊन हॉटेलवर आला व 10 हजार रुपये हे आजच द्यावे लागतात, असे हॉटेल मालकाला म्हणाला व निघून गेला. दरम्यान हॉटेल मालकाकडे दिलेल्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये रणखांबचे संभाषण रेकॉर्ड झाले होते. हे संभाषण ऐकल्यानंतर रणखांबला देण्यासाठी 2 हजार रुपयांच्या 5 नोटा हजर करण्यात आल्या. रणखांबला फोन करून पैसे कोठे घेऊन यायचे, याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा हॉटेलवरच पैसे देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रणखांब हा हॉटेलवर हजर झाला. तेव्हा सापळा पथकातील श्री. चौधरी व त्यांचे सहकारी हे हॉटेलच्या बाहेरील बाजूस  आडोशाला उभे राहिले. तेव्हा हॉटेल आवारातील दरवाजासमोरच रणखांबने 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली व ती खाकी वर्दीच्या पँटच्या खिशात टाकली. यावेळी हॉटेलमालकांनी तोंडावरील मास्क काढत लाच स्वीकारल्‍याचा आधीच ठरल्‍यानुसार इशारा केला आणि रणखांबवर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घातली.