Buldana Live Special : असा होता शाळेचा पहिला दिवस… विद्यार्थ्यांचे ऑनलाइन स्वागत, 25 टक्‍केच विद्यार्थी ऑनलाइन शिकणार, बाकीच्‍यांचे काय?; गुरुजींही चिंतित!; ‘बुलडाणा लाइव्‍ह’चा पहिला दिवस येळगावच्‍या शाळेत!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाच्या संकटापासून चिमुकल्यांना दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारने भलेही ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय घेतला असेल, पण या पद्धतीत आपले ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुलं शिकतील कशी, हा प्रश्न निर्माण झालाय. अनेकांकडे अजूनही स्मार्टफोन नाही. अशी ग्रामीण भागातील जवळपास 75 टक्के विद्यार्थीसंख्या आहे. आज, 28 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिला दिवस …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कोरोनाच्‍या संकटापासून चिमुकल्यांना दूर ठेवण्यासाठी राज्‍य सरकारने भलेही ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय घेतला असेल, पण या पद्धतीत आपले ग्रामीण, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुलं शिकतील कशी, हा प्रश्न निर्माण झालाय. अनेकांकडे अजूनही स्मार्टफोन नाही. अशी ग्रामीण भागातील जवळपास 75 टक्‍के विद्यार्थीसंख्या आहे. आज, 28 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिला दिवस मजेशीर राहिला. ज्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन राहता आले, ते राहिले… बाकीचे वंचित ठरले!; जे ऑनलाइन होते, त्‍यांनाही आवाजाचा प्रॉब्लम, कुणाच्‍या मोबाइलला रेंजच नव्‍हती. त्‍याही स्‍थितीत त्‍यांच्‍या स्वागताचे सोपस्‍कार शिक्षक, अधिकारी मंडळींनी पार पाडले. ट्रेलरच असा होता, तर आता ऑनलाइन शिक्षणाचा पिक्‍चर कसा असेल आणि त्‍यातून गोरगरीब विद्यार्थ्यांचेच नुकसान होणार असल्याने पुढे काय होईल, असे अनेक प्रश्न एकंदरीत चित्र पाहून पडल्यावाचून राहिले नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे अजूनही बंद असले तरी शिक्षकांसाठी आजपासून शाळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकूण शिक्षक संख्येच्या 50 टक्के क्षमतेने शिक्षकांनी शाळेत हजर रहावे याचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे, मुख्याध्यापकांनी मात्र रोज शाळेत हजर रहावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 1438 शाळा असून इतर नगर पालिका, खासगी, अनुदानित विनाअनुदानित शाळांची संख्या 1037 आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या 6500 असून, इतर शाळांच्या शिक्षकांची 11433 अशी आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख 18 हजार 853 एवढी आहे.

शिक्षकांनी शाळेत येऊन करायचे काय?
शिक्षकांना शाळेत येऊन ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉट्‌स ॲप ग्रुप बनवणे, दीक्षा ॲप पालकांच्या फोनमध्ये डाऊनलोड करून देणे, गेल्यावर्षी वाटप केलेली पुस्तके संकलित करून त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करणे आदी कामे शिक्षकांना करावी लागणार आहेत.

74 दिवसांनंतर उघडले गेट
कोरोनामुळे निर्बंध कठोर झाल्याने 14 एप्रिलपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या.तब्बल 74 दिवसानंतर आज शाळेचे गेट उघडण्यात आले.

अद्याप ना गणवेश, ना पुस्‍तके…
ऑनलाइन शाळा सुरू झाल्या असल्या तरी गणवेशाची सक्ती करण्यात आलेली नाही. गणवेशासाठी अजून निधी प्राप्त झाला नसून, पुस्तकांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक उमेश जैन यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी
नवीन सत्राच्या पहिल्या दिवशीच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत गेले. तिथे 90 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग भरवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 5 जुलैपर्यंत जिल्ह्यात प्रत्येक शाळेला गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आदी अधिकारी भेट देणार आहेत.

‘बुलडाणा लाइव्ह’ येळगावच्या जिल्हा परिषद शाळेत
बुलडाणा लाइव्हने आज येळगावच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. येळगाव जिल्हा परिषद शाळेत वर्ग 1 ते 7 पर्यंत 190 विद्यार्थी संख्या असून, 8 शिक्षक कार्यरत आहेत. पैकी 1 शिक्षक 30 जुलैला सेवानिवृत्त होणार आहेत. शाळेला एकूण 9 शिक्षक अपेक्षित असल्याने अजून, 2 शिक्षकांची शाळेला गरज असल्याचे मुख्याध्यापक रामकृष्ण दांडगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांविना शाळेत करमत नाही. नेहमीसारखा उत्साह नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन माध्यमातून पोहोचणे शक्य होत नाही. केवळ 25 टक्के पालक ऑनलाइन शिक्षण, मोबाइल, इंटरनेट याबाबतीत जागरूक असल्याचे शिक्षक सुनील इंगळे यांनी सांगितले.