Buldana Live Special : उंद्री मंडळात अतिवृष्टी; बुलडाणा, चिखली, खामगाव तालुक्‍यात मुसळधार, शेतकऱ्यांच्‍या जमिनी खरडल्‍या, पेरणी वाया

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील खामगाव, चिखली, बुलडाणा तालुक्यांत काल, 16 जूनच्या सायंकाळनंतर वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. उंद्री महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे समोर आले असून, या तिन्ही तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या गेल्या आहेत. पेरणी वाया गेली आहे. काल रात्रीपासून आज सकाळी साडेदहापर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार, चिखली तालुक्यात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील खामगाव, चिखली, बुलडाणा तालुक्‍यांत काल, 16 जूनच्‍या सायंकाळनंतर वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. उंद्री महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे समोर आले असून, या तिन्ही तालुक्‍यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्‍या जमिनी खरडल्‍या गेल्या आहेत. पेरणी वाया गेली आहे.

काल रात्रीपासून आज सकाळी साडेदहापर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार, चिखली तालुक्यात सर्वाधिक 28.7 मि.मी. पाऊस झाला. बुलडाणा 23.8 मि.मी. आणि खामगाव तालुक्यांत 16.2 मि.मी. पाऊस पडला आहे. मात्र घाटाखालील शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, नांदुरा हे तालुके आजच्या तारखेपर्यंत कोरडेच आहेत. जिल्ह्यातील 90 महसूल मंडळांपैकी 9 महसूल मंडळांमध्ये आतापर्यंत 200 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. यात चिखली तालुक्यातील उंद्री, अमडापूर, एकलारा, मेहकर तालुक्यातील नायगाव, लोणी, वरवंड, जानेफळ, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड या मंडळांचा समावेश आहे.

उंद्री मंडळात अतिवृष्टी; जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंदही
चिखली तालुक्यातील उंद्री मंडळात काल सायंकाळपासून रात्रभरात धो धो पाऊस कोसळला. मुसळधार पावसाने नदीनाले तुडूंब भरून वाहत होते. उंद्री मंडळात एकाच दिवशी 104.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. उंद्री मंडळात आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक 309 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

शेतकऱ्यांच्‍या जमिनी खरडल्‍या, पेरणी वाया
खामगाव तालुक्‍यातील वझर महसूल मंडळात झालेल्या मुसळधार पावसाने नागझरी बुद्रूक शिवारातील पेरणी पूर्णतः वाया गेली आहे. वनिता देवानंद गुंड यांनी दोन एकरात सोयाबीन पेरणी होती. ती पेरणी वाया गेली आहे. शारदा नंदकिशोर मगर यांनी पाच एकरात उडीद, सात एकरात सोयाबीन पेरली होती. योगेश देवानंद गुंड यांनी दोन एकरात सोयाबीन, अनिल अशोक साठे यांनी चार एकरापैकी दोन एकर सोयाबीन, दोन एकर अद्रक पेरली होती. याशिवाय त्‍यांचे ठिबक सिंचनचेही नुकसान झाले आहे. देवानंद भगवान गुंड यांनी पेरलेली सोयाबीन, सुनीता मनोहर तोंडे यांची चार एकरातील सोयाबीन पेरणी, श्रीराम लक्ष्मण नकोद यांची अकरा एकरातील सोयाबीन पेरणी वाया गेली आहे. कृषी सहायकांनी पाहणी केली आहे. मात्र दुपारपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. याबाबत कृषी उपसंचालक विजय बेतीवार यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले, की अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. यासंबंधी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्राथमिक अहवाल मागितला आहे.

इथे दमदार हजेरी…
काल सायंकाळपासून बुलडाणा तालुक्यातील रायपूर 53.3 मि.मी., धाड 48.8 मि.मी., सातगाव म्हसला 31.3 मि.मी., चिखली तालुक्यातील उंद्री 104.8 मि.मी., हातणी 36.5 मि.मी., धोडप 51.5 मि.मी., खामगाव तालुक्यातील लाखनवाडा 51.5 मि.मी., वझर 54 मि.मी. या मंडळांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.

पूल गेला वाहून…
15 जूनच्‍या रात्री मेहकर तालुक्‍यातील कळपविहीर, शिवनीपिसा भागात जोरदार पाऊस होऊन या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला. त्‍यामुळे गावांचा संपर्क तुटला असून, पुलाचे काम तातडीने करावे. तोपर्यंत पर्यायी रस्‍ता करून द्यावा, अशी मागणी दोन्‍ही गावांच्‍या ग्रामस्‍थांनी केली आहे.

मेहकर तालुका टॉपला तर शेगाव तळाशी…
जिल्ह्यात आज 17 जूनपर्यंत पडलेल्या पावसात मेहकर तालुका सर्वोच्च स्थानी तर शेगाव तालुका तळाशी आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस असा (मि.मी.मध्ये)
मेहकर : 160.9
चिखली ः 155.1
खामगाव : 116.4
सिंदखेड राजा : 116.0
संग्रामपूर : 94.1
लोणार : 75.5
बुलडाणा : 67.6
देऊळगाव राजा : 47.0
नांदुरा : 46.7
मोताळा : 37.8
मलकापूर : 26.1
जळगाव जामोद : 17.6
शेगाव : 7.1

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमीच
गेल्यावर्षी 17 जून 2020 पर्यंत जिल्ह्यात 1564.0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी आजपर्यंत जिल्ह्यात 967.9 पावसाची नोंद करण्यात आली आहे.