Buldana Live Special : नशिबानं थट्टा मांडली… पण सोशल मीडियामुळे आई-मुलांची झाली 20 वर्षांनी भेट!; सिंधुदूर्ग अन्‌ सिंदखेड राजाचं असंही कनेक्‍शन!

बुलडाणा/सिंदखेड राजा (मनोज सांगळे/बाळासाहेब भोसले) ः सोशल मीडियामुळे नाती दूर जात असल्याची टीका होत असली तरी, आजूबाजूलाच पहा, याच सोशल मीडियामुळे दुरावलेली अनेक नाती सापडली आहेत!, त्यांच्यातील दुरावा संपविण्याचे काम करणाऱ्या सोशल मीडियाने घडविलेली एक अनोखी कामगिरी बुलडाणा लाइव्हच्या हाती लागली आहे. सिंधुदूर्ग ते थेट सिंदखेड राजा असं अनोखं कनेक्शन जुळलं अन् आई-मुलांची तब्बल 20 …
 

बुलडाणा/सिंदखेड राजा (मनोज सांगळे/बाळासाहेब भोसले) ः सोशल मीडियामुळे नाती दूर जात असल्याची टीका होत असली तरी, आजूबाजूलाच पहा, याच सोशल मीडियामुळे दुरावलेली अनेक नाती सापडली आहेत!, त्‍यांच्यातील दुरावा संपविण्याचे काम करणाऱ्या सोशल मीडियाने घडविलेली एक अनोखी कामगिरी बुलडाणा लाइव्‍हच्‍या हाती लागली आहे. सिंधुदूर्ग ते थेट सिंदखेड राजा असं अनोखं कनेक्‍शन जुळलं अन्‌ आई-मुलांची तब्‍बल 20 वर्षांनी भेट घडली आहे. हा हृदयस्पर्शी क्षण घडवून आणला तो चौके (ता. मालवण) व सिंदखेड राजा येथील काही माणुसकीसाठी जगणाऱ्या मंडळींनी!

झालं असं, की द्वारकाबाई ढोले (पूर्वाश्रमीच्‍या सुमती वाघ) या पतीसह मुंबईत राहत होत्या. मूळच्‍या त्‍या सिंदखेड राजा तालुक्‍यातील चिंचोलीच्‍या. त्‍यांचे सासर जालना जिल्ह्यातील पास्ता येथील. पतीला दारूचे व्‍यसन होते. दारू पिऊन आल्यावर तो पत्‍नीला छळायचा, मारहाण करायचा. त्‍याच्‍या त्रासाला कंटाळून त्‍या पायीच गावाकडे निघाल्या. रस्‍ता माहीत नव्‍हता. सिंदखेड विचारत असताना, त्‍यांना कदाचित सिंधुदूर्गचा रस्‍ता सांगितला जात असावा. त्‍या सिंधुदूर्गच्‍या मालवण तालुक्‍यातील चौके गावात पोहोचल्या. तिथे माजी सभापती मनीषाताई वराडकर यांनी त्‍यांना आधार दिला. त्‍या 2001 पासून मुंबई येथून बेपत्ता झाल्या होत्या त्यावेळेस त्यांची मुले कृष्णा, शिवशंकर, गीता लहान होते. 2001 ते 2005 या कालावधीत त्यांच्या मुलांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची खबर स्थानिक पोलीस ठाण्यातही दिली. परंतु शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे मुले व नातेवाइकांनी शोधमोहीम थांबविली होती. त्यावेळी त्‍यांचा मोठा मुलगा केवळ 13 वर्षांचा होता व अन्य दोन मुले त्यावेळी खूपच लहान होती. 2005 पासून त्‍या चौके गावात राहिल्या. त्यांनी विविध ठिकाणी मोलमजुरीचे काम केले. मंदिर किंवा कोणाच्या घराच्या आश्रयाला राहून जे मिळेल ते खाऊन त्या दिवस कंठत होत्या.

माजी सभापती मनीषा वराडकर यांनी त्यांना केवळ आधारच दिला नाही तर जेव्हा त्‍या अडचणीत सापडायच्या, त्यावेळेस त्‍यांच्‍याकडे धाव घ्यायच्या. वराडकर या त्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्‍यांच्या आजारपणात प्रणाली गावडे यांनी त्यांना आर्थिक मदत केली. द्वारकाबाई आपले नाव सुमती वाघ मु. पो. चिंचुली, आडगावराजा ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा असे सांगायच्या. परंतु इतर फारशी माहिती सांगत नव्हत्या. मनीषा वराडकर व त्यांच्‍या मुलीने ही सर्व माहिती लिहून ठेवली होती. अनेकवेळा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी द्वारकाबाईंची माहिती डॉ. शरद काळसेकर यांना दिली. डॉ. काळसेकर हे राज्य पातळीवरील डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. त्यांनी द्वारकामाईंचे छायाचित्र व त्यांची माहिती असणारी पोस्ट डॉक्टरांच्या ग्रुपवर टाकली. नंतर जालना व परभणी येथील डॉक्टरांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही पोस्‍ट दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते यांच्‍या निदर्शनास आली. त्‍यांनी तातडीने पोस्‍टची खात्री करण्यासाठी डॉ. काळसेकर यांच्‍यापर्यंत संपर्क केला. पोस्‍ट खरी असल्याची खात्री पटल्‍यानंतर द्वारकाबाईंच्या गावात जाऊन माहिती घेण्यात आली. त्‍यांच्या मुलांचा शोध लागला. त्यांचे मुलगे कृष्णा व शिवशंकर आता मोठी झाली आहेत. त्‍यांना आई सापडल्‍याची वार्ता कळताच आनंदाला पारावार उरला नाही. चिंचोली येथील सरपंच भगवान पालवे यांना घेऊन मुलांनी चौके गाव गाठले. त्‍यांनी सर्वप्रथम मनीषा वराडकर, डॉ. काळसेकर, वाहक घुगे यांची भेट घेतली. त्यांना आईशी संबंधित सर्व कागदपत्रे दाखविली. त्यानंतर आई द्वारकामाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. घटनेची माहिती देण्यासाठी सर्व जण मालवण पोलीस ठाण्यात गेले. रात्री उशिरापर्यंत पोलिसी सोपस्कार पार पडल्यानंतर कृष्णा व शिवशंकर हे आई द्वारकाबाईंना घेऊन चिंचोलीकडे रवाना झाले.

यांनी घडवली मायलेकरांची भेट…
लोकजागरचे प्रवीण गिते यांच्‍यासह मनीषा वराडकर, डॉ. शरद काळसेकर, एसटीचे वाहक सोपान घुगे, सरपंच भगवान पालवे, इतर नंबर उपलब्ध करून देणाऱ्या सरिता पवार, विजय घुगे, सोपान घुगे, रमेश सोसे, पोलिस काॅन्स्टेबल श्री. जायभाये, प्रकाश मुंढे, राजू वाघ यांच्‍यामुळे माऊली आप्तस्वकियांकडे पोहोचू शकली. ११ जून रोजी सुमती वाघ आपल्या मुलासह चिंचोली गावात दाखल झाल्या. त्या निमित्ताने गावकऱ्यांनी या कामात सहकार्य करणारे प्रविण गिते यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी माऊलीच्‍या आगमनानिमितांन पुष्प गुष्छ देऊन स्वागत केले.