Buldana Live Special : “बलबीर पाशा’ला एड्‌स होणार का? त्‍याचीही जिल्ह्यातील ३८३३ रुग्‍णांत भर पडेल का??

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही वर्षांपूर्वी “बलबीर पाशा’ची जाहिरात खूप गाजली होती. एड्स आजाराबद्दल जनजागृती करणाऱ्या या हटके जाहिरातीचा परिणामही मोठा दिसून आला होता. बलबीर पाशा अशी कोणती व्यक्ती नव्हती, पण त्या काल्पनिक व्यक्तीने अनेकांना असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यापासून रोखले असेच म्हणावे लागेल. आता ही जाहिरात आठवण्याचं कारण म्हणजे, आपल्या बुलडाणा …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही वर्षांपूर्वी “बलबीर पाशा’ची जाहिरात खूप गाजली होती. एड्‌स आजाराबद्दल जनजागृती करणाऱ्या या हटके जाहिरातीचा परिणामही मोठा दिसून आला होता. बलबीर पाशा अशी कोणती व्‍यक्‍ती नव्हती, पण त्‍या काल्पनिक व्‍यक्‍तीने अनेकांना असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यापासून रोखले असेच म्‍हणावे लागेल. आता ही जाहिरात आठवण्याचं कारण म्हणजे, आपल्या बुलडाणा जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेले तीन हजार ८३३ एड्‌सबाधित रुग्‍ण… गेल्या वर्षभरातही ११४ जण नवे एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्‍यामुळे जिल्ह्यातही बलबीर पाशांना एड्‌स होणार का, असा प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात सध्या उपचार घेतलेले सर्वच रुग्‍ण एड्‌सबाधिताशी संबंध ठेवून ग्रस्‍त झालेत असे नाही. पण अशा सुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे.

गेल्या १० वर्षांत एड्समुळे १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या एड्‌सला प्रतिबंध घालण्यात जिल्ह्याला चांगलेच यश मिळाले आहे. १० वर्षांपूर्वी १.१० टक्के इतका असलेला पॉझिटिव्ह रेट आता केवळ ०.१० इतका आहे. प्रतिबंध, उपाययोजना आणि जनजागृती याबाबतीत जिल्ह्याचा राज्‍यात तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर अमरावती तर दुसऱ्या क्रमांकावर हिंगोली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना ही माहिती दिली.

जिल्ह्यात २००९ पासून एचआयव्हीच्या तपासण्या सुरू झाल्या. जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय याठिकाणी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र उघडण्यात आले आहेत. तेथे एचआयव्हीची मोफत तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांसाठीही एचआयव्ही तपासणीची सुविधा आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी अडीच लाख लोकांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात येतात, अशी माहिती श्री. टाले यांनी दिली. जिल्ह्यातील तीन हजार ८३३ रुग्णांवर मोफत औषधोपचार केला जातो. प्रत्येक रुग्णाला दरमहा ५ हजार रुपयांची मोफत औषधे दिली जातात. जिल्ह्यात सहा ठिकाणांवरून हा औषध पुरवठा करण्यात येतो. एड्सबाधित रुग्णाला दीर्घकाळ आयुष्य जगायचे असल्यास त्याला ही औषधे घ्यावी लागतात. या औषधामुळे शरीरातील एचआयव्हीचा विषाणू वेगाने वाढत नाही. त्‍यामुळे इतर आजार न होता रुग्ण दीर्घकाळ जगू शकतो. मात्र तरीही काही रुग्ण औषधे न्यायला टाळाटाळ करतात. अशावेळी त्यांच्या घरी जाऊन औषधे द्यावी लागतात, असेही श्री. टाले यांनी सांगितले.

या कारणांमुळे जिल्ह्याची दमदार कामगिरी
एड्सला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील १३ कॉलेजमध्ये रेड रेबन क्लब स्थापन करण्यात आला आहे. इथे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये एड्सबद्दल जनजागृती केली जाते. त्यासाठीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थी गावागावांमध्ये जाऊन एड्सबद्दल जनजागृती करतात. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षातर्फे युवक, ड्रायव्हर, स्थलांतर करणारे कामगार, देहविक्री करणाऱ्या महिला, समलिंगी संबंध ठेवणारे युवक यांच्यामध्ये जागृती करून त्यांच्या तापासणीवर भर दिला जातो. यापैकी कुणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत एचआयव्ही बाधित जोडप्यांचे २५ विवाहसुद्धा लावून देण्यात आले आहेत. एचआयव्ही बाधित व्यक्तीला कुणी हिणतेची किंवा दुय्यम वागणूक देत असेल, एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून नोकरीवरून काढत असेल तर अशा प्रकरणामध्ये एचआयव्ही ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो, असेही श्री. टाले म्हणाले.

या चार कारणामुळे होतो एड्‌स…

  • एचआयव्ही बाधित महिला किंवा पुरुषासोबत असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास.
  • एचआयव्ही बाधित व्यक्तीने वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया वापरण्यात आल्यास.
  • एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त, जखमेद्वारे किंवा अन्य मार्गाने निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास.
  • गरोदर माता एचआयव्ही बाधित असेल आणि औषधोपचार केला नसेल तर होणारे बाळ एचआयव्ही बाधित असण्याची शक्यता असते.
  • स्थलांतरित कामगार,ड्रायव्हर, देहविक्री करणाऱ्या महिला आणि समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण अधिक आहे.

गरोदर मातेची एचआयव्ही टेस्ट न चुकता करा..
गरोदर मातेची एचआयव्ही टेस्ट न चुकता केली पाहिजे. माता एचआयव्ही बाधित असली तरी औषधोपचार केल्याने होणारे बाळ एचआयव्हीपासून वाचवता येऊ शकते, असे श्री टाले म्हणाले.

मागील वर्षी ११४ रुग्ण; कोरोनामुळे टेस्टही घटल्या…
जिल्ह्यात २००९ मध्ये पहिल्यांदा ५८३ एड्सचे रुग्ण आढळले होते. मागील वर्षी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत १ लाख ४६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११४ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. चालू वर्षात एप्रिल २०२१ ते जून २०२१ या तीन महिन्यांत जिल्ह्यात ३५ हजार चाचण्यांमधून ४१ नवीन एचआयव्ही बाधित रुग्ण सापडले.

एड्सचा प्रतिबंध

  • एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
  • लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.
  • तुम्हाला एच. आय. व्ही. संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एच. आय. व्ही. संसर्ग तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते.
  • जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
  • रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.
  • इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा.