Corona… खासगी रुग्‍णालयांच्‍या लुटीला बसणार चाप; तपासणीचे पालकमंत्र्यांचे आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जी खासगी रुग्णालये कोविडवरील उपचार करत आहेत, त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही हे तपासून बघावे. त्यांना नियमानुसार परवानगी द्यावी. तसेच खासगी रुग्णालये रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेत तर नाही ना याबाबतही तपासणी करावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, 11 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जी खासगी रुग्णालये कोविडवरील उपचार करत आहेत, त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही हे तपासून बघावे. त्यांना नियमानुसार परवानगी द्यावी. तसेच खासगी रुग्णालये रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेत तर नाही ना याबाबतही तपासणी करावी, असे आदेश राज्याचे अन्‍न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, 11 एप्रिलला दिले. जिल्ह्यात दिवसेंदिवस  कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत यंत्रणांनी गाफील राहू नये. आलेल्या परिस्थितीवर मात करत यंत्रणांनी ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा व वापराचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशी सूचनाही त्‍यांनी केली.

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांच्‍या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्‍यावेळी पालकमंत्री बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी उपस्थित होते. अन्‍न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होता कामा नये. डायलिसीसवरील रुग्ण पॉझीटीव्ह निघाल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच त्याचे नियमित डायलिसीस करण्यात यावे. रेमडेसिवीरचा जास्त वापर झाल्यास रुग्णांना साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे अतिआवश्यक असल्यासच त्याचा वापर करावा, असे ते म्‍हणाले. जिल्ह्यात प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक कोविड रुग्णालय तयार करता येईल का याबाबत जिल्हाधिकारी यांनी चाचपणी करावी. सिंदखेड राजा येथील शासकीय रक्तपेढी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. परिस्थिती बघता राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला जिल्हावासियांनी समर्थ द्यावे, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले. यावेळी त्‍यांनी कोविडचा पॉझिटिव्हिटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.