Corona Virus Update : एप्रिल फुल नव्हे, खरोखर 710 पॉझिटिव्ह! बुलडाण्याचे द्विशतक, खामगाव सव्वाशेच्या घरात!! नांदुऱ्याची पुन्हा उसळी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून असलेली सरासरी कायम ठेवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात गत् 24 तासांत 710 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोविडचा हॉटस्पॉट ठरलेल्या बुलडाणा तालुक्याने आज, 1 एप्रिल( फुल) च्या मजेदार व सर्वांची फिरकी घेणाऱ्या मुहूर्तावर सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडला तर खामगाव तालुक्याने सव्वाशेच्या घरात मजल मारली. मागील काही दिवसांपासून …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून असलेली सरासरी कायम ठेवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात गत्‌ 24 तासांत 710 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोविडचा हॉटस्पॉट ठरलेल्या बुलडाणा तालुक्याने आज, 1 एप्रिल( फुल) च्या मजेदार व सर्वांची फिरकी घेणाऱ्या मुहूर्तावर सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडला तर खामगाव तालुक्याने सव्वाशेच्या घरात मजल मारली. मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या नांदुरा तालुक्याने नव्याने उसळी घेत पाऊणशेचा टप्पा गाठला.

नमुने संकलन, तपासणीची संख्या कमी असली तरी जिल्ह्यात पाचशेचा आकडा ठरलेला! मागील आठवड्यात फक्त 30 मार्चलाच 518 चा आला, हा अपवाद वगळता इतर दिवशी सव्वा सहाशेच्या आसपासच पॉझिटिव्ह आले आहे. मार्च एन्डला 630 चा आकडा आला असतानाच एप्रिलच्या पहिल्याच तारखेला 710 पॉझिटिव्हचा आकडा आलाय! यामुळे कोरोना काही एप्रिल फुलच्या मूडमध्ये नाय हे दिसून आले. नवीन महिन्याची सुरुवातच अशी तर आगे आगे देखीये होता है क्या… असा इशाराच कोरोना उर्फ कोविड कुमार ने दिलाय असे सांगता येईल.

झंझावात…

दरम्यान बुलडाणा व खामगाव या तालुक्यांतील कोरोनाचा झंझावात कमी व्हायला तयार नाही. मागील काही दिवसांत अपवाद वगळता दोन्ही तालुक्यांत शंभरच्या वरच रुग्ण येत आहेत. अधूनमधून दीडशे तर कधी डबल सेंच्युरीपर्यंत हे तालुके पोहोचत आहेत. आज बुलडाणा तालुक्यात 226 तर खामगावमध्ये 123 पॉझिटिव्ह निघाले. याखालोखाल डेंजर झोनमधील चिखलीत 87, नांदुऱ्यात 78, मलकापूरमध्ये 56 बाधित मिळाले, या तुलनेत अन्य तालुक्यांत कोरोना शांत असल्याचे चित्र आहे. मोताळा 33, लोणार 21, सिंदखेड राजा 19, जळगाव  जामोद 7 व संग्रामपूर 3 अशी आकडेवारी आहे.