Corona Virus Update : 1228 कोरोना पॉझिटिव्ह, 9 मृत्यू! बळींची संख्या पाचशे पल्याड; 6 तालुक्यांत कोविड शतकपार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंदू संस्कृतीनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांमध्ये अक्षयतृतीयाचा समावेश आहे. पण आजच्या आनंदावर एका मेड इन चायना अदृश्य शत्रूने अक्षरशः विरजण फिरविले! शुभ दिवसांवर 1228 पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यासह कोरोनाने अक्षरशः वरवंटा फिरवला आहे. तब्बल 6 तालुक्यांत 107 पेक्षा जास्त रुग्णांचा आकडा, काही तालुके शेकड्याच्या जवळ, काही तालुक्यांची अर्धशतके असा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  हिंदू संस्कृतीनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांमध्ये अक्षयतृतीयाचा समावेश आहे. पण आजच्या आनंदावर एका मेड इन चायना अदृश्य शत्रूने अक्षरशः विरजण फिरविले! शुभ दिवसांवर 1228 पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या आकड्यासह कोरोनाने अक्षरशः वरवंटा फिरवला आहे. तब्बल 6 तालुक्यांत 107 पेक्षा जास्त रुग्‍णांचा आकडा, काही तालुके शेकड्याच्या जवळ, काही तालुक्यांची अर्धशतके असा रुद्रावतार घेऊन आजचा कोरोना आला आहे.  यावर कळस म्हणजे 9 जणांचा झालेला मृत्यू अन्‌ बळींनी पार केलेला पाचशेचा आकडा!!

गत्‌ 24 तासांतील कोविडकुमारचे हे उपद्‌व्याप, धुमाकूळ, थैमान प्रलयंकारी असेच आहे. जिल्हावासीयांना कोणत्याही परिस्थितीत सुखाने जगू द्यायचे नाही या जिद्दीने पेटलेला कोरोना किती भयावह आहे हे सिद्ध करण्यासाठी आजची आकडेवारी पुरेशी आहे. बुलडाणा तालुका 186, शेगाव 117, देऊळगाव राजा 116, चिखली 108, मेहकर 107 ,नांदुरा 133, खामगाव 97, लोणार 91, मलकापूर 78 या तालुक्यांत कोरोनाने असे थैमान मांडले. मोताळा 46, जळगाव जामोद 67, सिंदखेडराजा 56, संग्रामपूर 26 अशी इतर तालुक्यातील लागण आहे.

अबब 501...

दरम्यान आजच्या शुभ मुहूर्तावर बळींची संख्या पाचशेच्या पल्याड पोहोचली! गत 24 तासांत उपचारादरम्यान गेरू (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, शेलगाव नाका खामगाव येथील 50 वर्षीय महिला, उंबरा (ता. खामगाव) येथील 55 वर्षीय महिला, सरंबा ता. (लोणार) येथील 80 वर्षीय महिला, मारोती पेठ, मेहकर येथील 45 वर्षीय पुरुष, हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथील 58 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 81 वर्षीय पुरुष, चिखली येथील 56 वर्षीय महिला, बुलडाणा येथील येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महिला रुग्णालय बुलडाणा व खामगाव सामान्य रुग्णालयात प्रत्येकी 3, आशीर्वाद हॉस्पिटल 2 तर हेडगेवार हॉस्पिटल चिखली 1 असा मृत्यूचा खेळ आहे.

5032 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 6260 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5032 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1228 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 950 व रॅपीड टेस्टमधील 278 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1934 तर रॅपिड टेस्टमधील 3098 अहवालांचा समावेश आहे.

रुग्णालयात 5729 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 589 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 407157 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 69936 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1437 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 76166 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5729 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.