Exclusive… शुभमंगल सावधान!; कोरोनामुळे नोंदणी विवाहात घट; गेल्या वर्षी 268, यंदा आतापर्यंत 70 जोडप्यांचे शुभमंगल!!; 14 युगुलांनी साधला ‘व्‍हॅलेंटाइन’ मुहूर्त

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना, लॉकडाऊनचा परिणाम नोंदणी विवाहांवर झाला असल्याचे आकडेवारीवरून बुलडाणा लाइव्हच्या समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीचा मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मेमधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद होते. याच काळात अनेकांच्या नोकरी, व्यवसायांवर गदा आली. नोंदणी विवाह घटले. गेल्या वर्षी 268 तर यंदा आतापर्यंत 70 जोडप्यांचे शुभमंल लागले. …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना, लॉकडाऊनचा परिणाम नोंदणी विवाहांवर झाला असल्याचे आकडेवारीवरून बुलडाणा लाइव्‍हच्‍या समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीचा मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मेमधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद होते. याच काळात अनेकांच्या नोकरी, व्यवसायांवर गदा आली. नोंदणी विवाह घटले. गेल्‍या वर्षी 268 तर यंदा आतापर्यंत 70 जोडप्‍यांचे शुभमंल लागले.

यातुलनेत जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या वर्षभरात तब्‍बल 477 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला होता. त्‍यामुळे गेल्‍या वर्षी कोरोनामुळे अर्ध्याने संख्या घटल्‍याचे दिसून आले. यंदा 2021 च्‍या मुहूर्तावर 1 जानेवारी ते आज 24 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात 70 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे.
पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जातो. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यात जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊन काळात नोंदणीची संख्या कमी होती. मात्र यावर्षी नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी विजय तेलंग (सह दुय्यम निबंधक वर्ग 1,बुलडाणा) यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना वर्तविली.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये वाढते विवाहाचे प्रमाण
दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन वीकमध्ये विवाह करून जोडीदाराला गिफ्ट देण्याचा विचार प्रेमीयुगल करत असतात. मात्र बऱ्याचदा घरच्यांच्या विरोधामुळे असे विवाह सार्वजनिक स्वरूपात करत येत नाहीत. त्यामुळे अशावेळी हे जोडपे कायद्याचा आधार घेऊन नोंदणी विवाहाला पसंती देतात. यावर्षी 14 फेब्रुवारीला रविवार आणि 13 ला दुसरा शनिवार असल्याने जोडप्यांनी 12 फेब्रुवारी रोजीच विवाह उरकून घेतला. 12 फेब्रुवारी रोजी 14 जोडप्यांनी संसाराला सुरुवात केली.
नोंदणी पद्धतीने विवाह करायचाय?
नोंदणी विवाहासाठी वराचे वय हे 22 आणि वधूचे वय हे 19 वर्ष पूर्ण असावे लागते.नोंदणी विवाहासाठी महिनाभरापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. विवाह नोंदणी कार्यालयात जाताना ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जाची एक प्रत, वधू- वराच्या वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, फोटो ओळखपत्र उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, वर- वधू यांचे प्रत्येकी 4 पासपोर्ट साईझ फोटो, तीन साक्षीदार आणि त्यांचे आधारकार्ड, स्वयंघोषणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.