Exclusive… हाल-ए-कोविड सेंटर… पोटभर जेवण मिळत नसल्याच्‍या तक्रारी तर कुठे महिला-पुरुषांसाठी एकच स्वच्‍छतागृह!; प्रशासनापुढेही अनेक अडचणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने जिल्ह्यातील कोविड सेंटर्सवरचा ताण वाढला आहे. गृह विलगीकरणीतील रुग्णांबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सध्या संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. त्यामुळे अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येने कोविड सेंटरमधील यंत्रणा सुद्धा भांबावली आहे. याचा परिणाम रुग्णांना सुविधा देण्यावर होत असून, अनेक सेंटरमध्ये पोटभर जेवण मिळत नसल्याच्या तर कुठे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने जिल्ह्यातील कोविड सेंटर्सवरचा ताण वाढला आहे. गृह विलगीकरणीतील रुग्णांबद्दलच्‍या तक्रारी प्राप्त झाल्याने सध्या संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. त्‍यामुळे अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येने कोविड सेंटरमधील यंत्रणा सुद्धा भांबावली आहे. याचा परिणाम रुग्‍णांना सुविधा देण्यावर होत असून, अनेक सेंटरमध्ये पोटभर जेवण मिळत नसल्याच्‍या तर कुठे महिला-पुरुषांसाठी एकच स्‍वच्‍छतागृह असल्याच्‍या तक्रारी आहेत. अन्नाच्‍या दर्जाबद्दलही मागे तक्रारी प्राप्‍त झाल्या होत्‍या. मात्र त्‍या तक्रारी हळूहळू कमी होत असल्या तरी, मिळणारे जेवण पुरेसे नसल्याची तक्रार कायम आहे. जेवण देणाऱ्यांकडून वेळेबाबतही मनमानी सुरू असल्याचे चित्र असून, याबाबत विचारणा करणाऱ्या रुग्‍णांना अरेरावी ऐकावी लागत असल्याचे मागासवर्गीय मुलीच्‍या शासकीय वसतिगृहातील सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने बुलडाणा लाइव्‍हकडे सकाळीच तक्रार केली.

जिल्ह्यात सध्या 16 शासकीय कोविड सेंटर आहेत तर 2 खाजगी कोविड सेंटर आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांकडे या कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोविड सेंटरमध्ये सुविधा पुरवण्याचे कंत्राट त्या त्या ठिकाणच्या कंत्राटदारांना देण्यात आले आहे.

तक्रारीत घट आली होती, पुन्‍हा वाढल्या…
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोविड सेंटरच्या भरपूर तक्रारी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे येत होत्‍या. पालकमंत्र्यांनी स्‍वतः यात लक्ष घातले होते. नंतरच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरल्याने बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत होत्या. मात्र गेल्या एक महिन्यापासून रुग्णसंख्येत आणि शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने सुविधा पुरविताना यंत्रणा सुद्धा पुन्‍हा हतबल झाल्याचे चित्र आहे.

या आहेत तक्रारी

  • बुलडाण्यातील मागासवर्गीय मुलीच्‍या शासकीय वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पुरुष आणि महिला रुग्णांसाठी एकाच शौचालयाची व स्नानगृहाची व्यवस्था आहे. तसेच मिळणारा अल्पाेपहार आणि जेवण सुद्धा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार तेथील एका रुग्णाने बुलडाणा लाइव्‍हकडे केली आहे. विशेष म्‍हणजे हे रुग्‍ण कोविड योद्ध्ये आहेत. तरीही त्‍यांना जेवण देणाऱ्याने अरेरावी केल्याची तक्रार त्‍यांनी केली आहे.
  • मलकापूरच्या कोविड सेंटरमधील रुग्णांना केवळ 2 चपात्या आणि मूठभर भात एवढेच अन्‍न मिळत असल्याने रुग्णांना अर्धपोटी रहावे लागत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला असता आम्हाला एवढेच अन्न पुरवण्याचे निर्देश आहेत असे उत्तर कंत्राटदाराने दिले होते.त्यामुळे हरीश रावळ यांनी स्वखर्चातून रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
  • चिखली कोविड सेंटरच्या तक्रारींची संख्या अधिकच आहे.जेवणाचा दर्जा, अपुरे आणि अर्धवट शिजलेले अन्न, पिण्याच्या पाण्याचा दर्जा, स्वच्छता अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. इथल्या कोविड सेंटरच्या दुरावस्थेसंदर्भात काही व्‍हिडिओ सुद्धा रुग्णांनी व्हायरल केले होते.
  • अशाच स्वरूपाच्या तक्रारी जिल्ह्यातल्या अन्य कोविड सेंटरच्या प्राप्त झाल्या आहेत.काही ठिकाणी अन्नाचा दर्जा उत्तम असला तरी ते पोटभर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

प्रशासनाची हतबलता

कोविड संसर्गजन्य आजार असल्याने आणि खात्रीशीर उपाय उपलब्ध नसल्याने अनेक कोविड सेंटरमध्ये अन्न पुरवणाऱ्या काही कंत्राटदारांनी माघार घेतली. कुणी भोजन पुरवण्यासाठी तयार होत नव्हते. तशीच अवस्था स्वच्छता कर्मचारी आणि इतर सुविधा पुरवणाऱ्यांचीही आहे. त्यामुळे ही सर्व तडजोड करताना प्रशासनही हतबल असल्याचे चित्र आहे.

घरचा डब्बा आणण्याची परवानगी दिली आणि डब्यात निघाली दारू

चिखलीच्या कोविड सेंटरमध्ये स्थानिक रुग्णांना घरचा डब्बा बोलावण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र एका तळीराम रुग्णाने ही संधी साधत जेवण्याच्या डब्यातून दारू बोलावल्याचे समोर आले होते.

अधिकारी म्हणतात

कोविड वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय हे श्यक्य नाही. प्राप्त तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न असतो.

डॉ. राजेंद्र सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

चिखली कोविड सेंटरच्या अन्न पुरवठ्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तात्काळ ते अन्न बदलून देण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले होते. अन्न बेचव असल्याचा काही तक्रारी असतात मात्र कोविड आजारात रुग्णांना चव कळत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.रुग्ण आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने सध्या चिखली कोविड सेंटरची स्थिती उत्तम आहे. आणखी काही तक्रारी असतील तर आंमच्यापर्यंत कळवा त्याचा लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू.
– अजित येळे, तहसीलदार चिखली