“MPSC’ला बुलडाण्यात महा “गैरहजेरी’!; सव्वा तीन हजार उमेदवार आलेच नाहीत!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे म्हणा किंवा अन्य अपरिहार्य कारणामुळे परीक्षा लांबली की निषेध करायचा किंवा आंदोलने करायची आणि परीक्षा झाली की त्याकडे पाठ फिरवायची अशी एक परंपराच एमपीएससी परीक्षेत निर्माण झाली आहे. आज, 4 सप्टेंबरला पार पडलेल्या पूर्व परीक्षेत देखील ही दुर्दैवी परंपरा कायम राहिली असून, तब्बल 3318 उमेदवारांनी या …
 
“MPSC’ला बुलडाण्यात महा “गैरहजेरी’!; सव्वा तीन हजार उमेदवार आलेच नाहीत!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे म्हणा किंवा अन्य अपरिहार्य कारणामुळे परीक्षा लांबली की निषेध करायचा किंवा आंदोलने करायची आणि परीक्षा झाली की त्याकडे पाठ फिरवायची अशी एक परंपराच एमपीएससी परीक्षेत निर्माण झाली आहे. आज, 4 सप्टेंबरला पार पडलेल्या पूर्व परीक्षेत देखील ही दुर्दैवी परंपरा कायम राहिली असून, तब्बल 3318 उमेदवारांनी या परीक्षेचा मुकाबला करण्याचे टाळले! या तुलनेत 6268 बहादूरांनी पूर्व परीक्षेचे आव्हान पेलण्याची हिंमत दाखविली.

कडक बंदोबस्त व शिस्तबद्ध वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजताच केंद्रावर पोहोचण्याचे सक्त निर्देश होते. ज्यांना परीक्षा द्यायची होती त्यांनी ही वेळ पाळली! सव्वातीन हजारांवर उमेदवारांनी मात्र केंद्राकडे फिरकण्याची तसदीच घेतली नाही. जवळपास 31 केंद्रांवर हीच स्थिती होती. खामगावातील जीएस कॉलेजमधील केंद्रावर सर्वाधिक म्हणजे 168 जणांनी दांडी मारली! बुलडाणामधील भारत विद्यालयामध्ये 139, सहकार विद्यामंदिरमध्ये 149 असा गैरहजारांचा आकडा होता. मागील जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

मात्र कोरोनामुळे ही परीक्षा आजवर लांबत आली. परिणामी दीड वर्षानंतर आज सकाळी 11 ते 12 दरम्यान ही परीक्षा पार पडली. 9 हजार 600 परीक्षार्थींसाठी बुलडाणा, चिखली व खामगाव शहरात मिळून 31 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज नियोजन करण्यात आले. परीक्षा लिपिक रवी सरोदे, संतोष काकडे, सचिन ठाकूर यांनी अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतले. 31 केंद्रांवर केंद्रप्रमुख, समावेक्षक, लिपिक, पर्यवेक्षक, सहायक, शिपाई मिळून 834 अधिकारी व कर्मचारी यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यात सहकार्य केले.